पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात स्वच्छ तसेच सुंदर शहर करण्यासाठी वेगेवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यत ९० टक्क्यांपर्यंत कचरा विलगीकरण होत असून ऑक्टोबर महिन्यापर्यंत हे प्रमाण १०० टक्क्यांपर्यंत जाईल, अशी ग्वाही पिंपरी पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी सोमवारी मुख्यालयात बोलताना दिली. यापुढील काळात ही उद्योगनगरी ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून नावारूपाला येईल, त्यादृष्टीने आवश्यक कार्यवाही सुरु आहे, असेही ते म्हणाले.

पिंपरी पालिकेच्या मुख्यालयात आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. शहराचे प्रथम आमदार ज्ञानेश्वर लांडगे, आमदार उमा खापरे, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, माजी महापौर अपर्णा डोके, माजी उपमहापौर राजू मिसाळ, माजी नगरसेवक नामदेव ढाके, अमित गावडे, गोविंद पानसरे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, माजी अध्यक्ष अंबर चिंचवडे यांच्यासह महापालिका कर्मचारी तसेच शहरातील नागरिक उपस्थित होते.

या वेळी बोलताना आयुक्त पाटील म्हणाले की, आतापर्यंतच्या वाटचालीत भारताने वेगवेगळ्या क्षेत्रांत अनेक ध्येय पादांक्रांत केली आहेत. देशाची चहुबाजूने प्रगती होत असून देशाच्या राष्ट्रपतीपदावर एक आदिवासी महिला विराजमान आहे , हेच आपल्या देशाच्या यशाचे मोठे उदाहरण आहे. पिंपरी-चिंचवडने एक आधुनिक शहर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. शहरात गेल्या काही वर्षात अनेक विकासकामे झाली आहेत. शहरातील नागरिकांसाठी पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहे. आणखी दोन रुग्णालयांचा समावेश होणार आहे. शहरात ठिकठिकाणी ‘जिजाऊ क्लिनिक’ लवकरच सुरु होणार आहे. पालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याचे प्रस्तावित आहे. पिंपरी चिंचवड शहर हे देशातील सर्वात स्वच्छ तसेच सुंदर शहर करण्यासाठी वेगेवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत. नवनवीन संकल्पनांसह अनेक नवीन उप्रक्रम महापालिका सर्वांच्या सहभागातून राबवत आहे, हाच सहभाग निरंतर राहावा, यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे आयुक्तांनी यावेळी व्यक्त केले.