मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उद्या सकाळी साडेआठच्या सुमारास पुण्यावरुन औरंगाबादच्या दिशेने रवाना होतील. पण त्यापूर्वी साडेसात वाजण्याच्या सुमारास १०० ते १५० ब्राह्मण पुढील कार्य चांगल्याप्रकारे पार पाडावे यासाठी राज ठाकरेंना आशीर्वाद देण्यासाठी येणार आहेत, अशी माहिती मनसेचे पुणे शहर अध्यक्ष आणि माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांनी दिली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत झालेल्या सभेत मशिदीवरील भोंगे याबाबत भूमिका जाहीर केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.आता राज ठाकरेंनी औरंगाबाद येथे एक मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनी जाहीर सभा होणार असून त्याकडे सर्वच राजकीय पक्षाचे लक्ष लागून राहिले आहे. राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्याला रवाना होण्यासंदर्भात मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांनी माहिती दिली. मुंबई येथून राज ठाकरेंचे दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पुण्यातील ‘राजमहाल’ येथील निवासस्थानी आगमन झाले. त्यावेळी कार्यकर्ते देखील उपस्थित होते. आज संध्याकाळी राज काही मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचं सांगितलं जातं.




त्याच दरम्यान तीन तारखेला रमजान ईद आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुणे शहर मनसेकडून पुण्यातील सर्व मंदिरात महाआरतीच आयोजन करण्यात आले आहे. त्या संदर्भात मनसेकडून तयारी सुरू असून आज शहर कार्यालयात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल त्यांच्या संलग्न असलेल्या सात ते आठ संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे.तसेच त्या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे संघटनांकडून सांगण्यात आले आहे.