पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची १४ जून रोजी घोषणा होणार आहे. या संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून लोकहितवादी यांनी स्थापन केलेली पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे पुस्तक महोत्सव या दोन संस्था इच्छुक आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत दिली. साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर या वेळी उपस्थित होते.
साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष व प्रभारी अध्यक्ष रे. गुरय्या स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सोमण, महाळंक आणि निफाडकर यांनी साहित्य महामंडळाचे पदाधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारली. स्वामी यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या जागी मध्य प्रदेश साहित्य संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सप्रे (भोपाळ) यांची साहित्य महामंडळाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
सोमण म्हणाले, ‘आगामी शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात आयोजित करण्याची घोषणा साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा येथे झालेल्या साहित्य संमेलनातच केली होती. त्यानुसार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुण्यात आयोजित करण्यात येणाऱ्या शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची १४ जून रोजी घोषणा होणार आहे. त्यासाठी स्थळ निवड समितीची स्थापना रविवारच्या बैठकीत करण्यात आली. त्यामध्ये साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, प्रमुख कार्यवाह, कोषाध्यक्ष यांच्यासह प्रतिभा सराफ (मुंबई मराठी साहित्य संघ), रामचंद्र काळुंखे (मराठवाडा साहित्य परिषद) आणि लखनसिंह कटारे (विदर्भ साहित्य संघ) यांचा समावेश आहे. ही स्थळ निवड समिती १२ आणि १३ जून रोजी पुण्यातील संभाव्य संमेलम स्थळांची पाहणी करणार आहे.
स्थळ निवड समितीचा अहवाल १४ जून रोजी होणाऱ्या साहित्य महामंडळाच्या बैठकीत सादर होणार असून त्याचदिवशी संमेलन स्थळावर शिक्कामोर्तब होईल. या संमेलनासाठी सहसंयोजक म्हणून लोकहितवादी यांनी स्थापन केलेली पुणे नगर वाचन मंदिर आणि पुणे पुस्तक महोत्सव या दोन संस्था इच्छुक आहेत. त्यापैकी एका संस्थेची निवडही १४ जून रोजी निश्चित केली जाणार आहे.’
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह सुनील महाजन आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे सचिन ईटकर यांच्या माध्यमातून दुब्ई येथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष अजय भांगे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला विश्व साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले आहे. मात्र, शंभरावे साहित्य संमेलन होईपर्यंत अन्य कोणत्याही स्वरूपाचे संमेलन आयोजित करु नये, असा निर्णय साहित्य महामंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार पुण्यातील शंभरावे साहित्य संमेलन पार पडल्यानंतरच या निमंत्रणाचा सकारात्मक विचार केला जाईल. – योगेश सोमण, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ.
सातारा संमेलनाच्या हिशोबासंदर्भात नव्याने पत्रव्यवहार
‘सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे हिशोब अद्याप साहित्य महामंडळाकडे सादर झालेले नाहीत. यासंदर्भात महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कोषाध्यक्ष या नात्याने या संमेलनाचे कार्याध्यक्ष आणि परिषदेचे माजी कोषाध्यक्ष यांना पत्र पाठविले होते. मात्र, अद्याप त्याला उत्तर आलेले नाही. आता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा कोषाध्यक्ष या भूमिकेतून नव्याने पत्रव्यवहार करण्यात येणार आहे,’ असे साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी सांगितले.
