औषध दुकानात फार्मासिस्ट उपस्थित नसल्याबद्दल अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) आतापर्यंत जिल्ह्य़ात १०१ औषध दुकानांचे परवाने रद्द केले आहेत. तर २३ ठिकाणी परवान्यांचे निलंबन करण्यात आले आहे.
औषधांची विक्री फार्मासिस्टच्या उपस्थितीतच व्हावी यासाठी एफडीएने एप्रिलपासून कडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत एफडीएकडून औषध दुकानांची तपासणी करून फार्मासिस्ट न आढळल्यास औषधविक्री बंद करण्यात येत आहे. तसेच औषध विक्रेत्यांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात येत आहेत. या नोटिसांवर औषध विक्रेत्यांनी एफडीएसमोर आपले म्हणणे मांडायचे असते. त्यानुसार त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाते. यात तपासणीवेळी फार्मासिस्ट हजर नसणे, डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांची विक्री करणे, विक्रीची बिले न देणे, विकलेल्या मालाची नोंदणी न ठेवणे अशा कारणांसाठी परिस्थितीनुसार परवान्यांचे निलंबनही होऊ शकते.  
औषध विभागाचे सहायक आयुक्त आर. ई. भिलारे यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्य़ात एप्रिलपासून एकूण १७४२ औषध दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. यात २५० दुकानांना ‘स्टॉप सेल’ तर ३३७ दुकानांना ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.