मागिल वर्षी चाकण येथे मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून हिंसाचार झाला होता. तेव्हा काही समाजकंटकांनी चाकण पोलीस ठाण्याला लक्ष करत पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना मारहाण केली होती. या घटनेप्रकरणी १०८ जणांना अटक केल्याची माहिती पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी दिली आहे. दरम्यान यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे नाव चौकशीत समोर आल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. व्हिडिओ आणि फोटोद्वारे तब्बल दोन हजार जणांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी १०८ जणांना अटक करण्यात आली आहे. आंदोलन आणि पोलीस ठाण्यावरील हल्ल्या या दोन्ही वेगळ्या घटना आहेत. यात निर्दोष व्यक्तीना त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मागिल वर्षी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून चाकण येथे मोर्चा काढण्यात आला होता. त्याला अचानक हिंसक वळण लागले होते. काही समाज कंटकांनी चाकण पोलीस ठाण्यावर हल्ला चढवला होता. त्यात अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली होती. तर शेकडो वाहनांच्या जाळपोळीसह दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान, चाकण पोलीस ठाण्यावर हल्ला करणाऱ्या १०८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्याचबरोबर १५ जण संशयीत असून २३ जणांची चौकशी सुरू आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी पत्रकारपरिषदेत दिली आहे. दरम्यान, ही कारवाई कोणाला लक्ष्य न करता, पारदर्शक व्हावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे.