पुणे : राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर अद्याप विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप केलेले नाही. मात्र, अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना दहावीचे गुणपत्रक आणि शाळा सोडल्याच्या दाखल्याची सक्ती न करता हमीपत्राच्या आधारे प्रवेश देण्याच्या सूचना माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी या बाबतच्या सूचना परिपत्रकाद्वारे विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिल्या आहेत. सन २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरु आहे. २१ मे पासून प्रवेश प्रकियेतील पहिल्या नियमित फेरीला सुरुवात करण्यात आली आहे. या फेरीमध्ये दिनांक २९ मे रोजी प्रवेशासाठीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.
इयत्ता दहावीचा निकाल राज्य मंडळाने जाहीर झाला असून अद्याप मूळ गुणपत्रिका विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या नाहीत. या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना त्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश निश्चित करायचा आहे, अशा विद्यार्थ्यांचा शाळा सोडल्याचा दाखला आणि इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणपत्रक अनिवार्य करण्यात येऊ नये. तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला शाळेकडून प्राप्त झाल्यानंतर सादर करण्यात येईल, असे हमीपत्र विद्यार्थ्यांकडून घ्यावे. गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल, याबाबत जाणीव करून देण्यात यावी. तसेच हमीपत्राआधारे विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतच्या सूचना कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांना देण्यात याव्यात, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्य मंडळाकडून प्रमाणपत्र डिजिलॉकरद्वारे उपलब्ध
राज्य मंडळामार्फत घेण्यात आलेल्या फेबुवारी-मार्च २०२६च्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे गुणपत्रक तथा प्रमाणपत्र अपार आयडीशी संलग्न स्वरुपात डिजिलॉकरवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. डिजिलॉकर प्रणालीवर परीक्षेचे वर्ष, परीक्षा सत्र, बैठक क्रमांक नमूद करून विद्यार्थ्यांना गुणपत्रक तथा प्रमाणपत्र प्राप्त करता येणार आहे. तसेच संबंधित डिजिटल गुणपत्रक तथा प्रमाणपत्र मंडळाच्या ई मार्कशीट पोर्टलवर (https://boardmarksheet.maharashtra.gov.in) डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली.
