scorecardresearch

बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे, सलग दुसऱ्या वर्षी प्रश्नपत्रिकेत चुका

दोन प्रश्नांसाठी केवळ सूचना देण्यात आल्या, तर एका प्रश्नासाठी प्रश्न न देता थेट उत्तरच देण्यात आले आहे.

english question paper mistake
बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकीचे (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्नांमध्ये चूक झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांसाठी केवळ सूचना देण्यात आल्या, तर एका प्रश्नासाठी प्रश्न न देता थेट उत्तरच देण्यात आले आहे. त्यामुळे या तीन प्रश्नांचे सहा गुण विद्यार्थ्यांना देण्याची मागणी करण्यात आली असून, सलग दुसऱ्या वर्षी इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेत चुका असल्याचे समोर आले आहे.

राज्यभरात बारावीची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. यंदा कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षेदरम्यानचे गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य मंडळाने काटेकोर उपाययोजना केल्या. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकल्याचे समोर आले. प्रश्नपत्रिकेतील ए ३ आणि ए ५ या प्रश्नांसाठी केवळ सूचना नमूद केलेल्या होत्या, तर ए ४ या प्रश्नात प्रश्नाऐवजी थेट उत्तरच देण्यात आले होते. त्यामुळे या तीन प्रश्नांबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला. अनेकांना प्रश्नच कळले नाही, तर काहींनी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. गेल्यावर्षीही इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे मंगळवारच्या इंग्रजी विषयाच्याच प्रश्नपत्रिकेत चुका झाल्याचे समोर आल्याने मंडळाच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही वाचा – मेट्रोचे बांधकाम साहित्य चोरणारा गजाआड

हेही वाचा – “मुंबईतील ‘ती’ फ्लेक्सबाजी मनाला लावून घेऊ नका”, अजित पवार यांचे आवाहन

विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यात येईल?

इंग्रजी विषयाची सभा विषय तज्ज्ञ आणि विभागीय मंडळांचे प्रमुख नियामक यांच्यासमवेत आयोजित करण्यात आली होती. मात्र धोरणात्मक मागण्यांबाबत शिक्षकांचा बहिष्कार असल्याने सभा होऊ शकली नाही. इंग्रजी विषयाच्या त्रुटींबाबत मुख्य नियामकांची संयुक्त सभा घेऊन संयुक्त सभेच्या अहवालानुसार विद्यार्थ्यांना योग्य न्याय देण्यात येईल, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 19:14 IST