scorecardresearch

चर्चेविना १२०० कोटींची कामे मंजूर ; ‘जाता जाता’ सत्ताधारी, विरोधकांचे गळ्यात गळे

गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत.

पुणे : महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपुष्टात येण्यास काही दिवस बाकी असल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी गळय़ात गळे घालत १५ मिनिटांत जवळपास १२०० कोटींची कामे करण्यास मान्यता दिली. विशेष म्हणजे या प्रस्तावांवर कोणतीही चर्चा करता ते मंजूर करण्यात आले.

आगामी महापालिका निवडणुकीचे बिगूल वाजले असून एप्रिलच्या अखेरीस किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात निवडणूक होण्याची शक्यता आहे. नगरसेवक पदाची मुदत संपुष्टात येण्यास अवघे वीस दिवस राहिल्याने विकासकामांना मुख्य सभेची मंजुरी घेण्यात आली आहे. शेवटच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी विनाचर्चा प्रस्तावांना मंजुरी दिल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. बाराशे कोटींच्या विकासकामांच्या प्रस्तावांमध्ये रुग्णालयांच्या उभारणीसाठी कर्ज घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येत आहेत. निवडणुकीची चाहूल लागल्यानंतर आरोपांची धारही तीव्र झाली आहे. विरोधकांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. तसेच बहुमताच्या जोरावर भाजपकडून अनेक प्रस्ताव मंजूर करून घेतले जात असल्याचा आरोपही यापूर्वी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सातत्याने केले आहेत. मात्र शेवटच्या सभेत गळय़ात गळे घालून शेकडो कोटींच्या कामांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

महापालिकेच्या सभागृहाची मुदत संपण्यापूर्वीची शेवटची मुख्य सभा होण्यापूर्वी पक्षनेत्यांची बैठक झाली. या बैठकीत आयत्या वेळी काही प्रस्ताव सादर करण्यात आले. प्रभागात विकासकामे करण्यासाठी नगरसेवकांना अंदाजपत्रकात योजना, प्रकल्पांसाठी राखीव असलेला निधीतून काही रक्कम देणे (वर्गीकरण प्रस्ताव), विविध विकासकामांचे भूमिपूजन, विकासकामांना नावे देणे, पुढील आर्थिक वर्षांसाठी पीएमपीला संचलन तूट देणे, वारजे आणि बालेवाडी येथे रुग्णालयाची उभारणी करणे असे पावणेदोनशे प्रस्ताव पक्षनेत्यांच्या माध्यमातून मुख्य सभेपुढे आले. त्यांना मान्यता देण्यात आली. यामध्ये नगरसेवकांना कामे करण्यासाठी किमान सत्तर कोटींचा निधी वर्गीकरणाचे प्रस्ताव मंजूर करून देण्यात आले आहेत. तर वारजे आणि बालेवाडी येथील रुग्णालयाच्या उभारणीसाठी कर्ज घेण्यासही मान्यता देण्यात आली आहे. हे प्रस्ताव मंजूर करताना विरोधकांनीही सत्ताधाऱ्यांना साथ दिली त्यामुळे कोणत्याही चर्चेविना प्रस्ताव मंजूर झाले.

संकल्पनाफलकासाठी राजकारण

सर्वपक्षीय नगरसेवकांकडून प्रभागात विविध विकासकामे करण्यात आली आहेत. नगरसेवकांनी केलेले रस्ते, उद्यान, चौकांना नावे देण्यावरूनही नगरसेवकांमध्ये वाद झाल्याची वस्तुस्थिती पुढे आली आहे. आपल्या संकल्पनेतून काम झाले हे दाखविण्यासाठी नगरसेवकांची लगबग सुरू आहे. त्यातून रस्ते, चौक, सुशोभीकरणाच्या कामांना नाव देण्याचे परस्परविरोधी प्रस्तावही सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी दिले आहेत. हे प्रस्ताव मान्य करण्यावरून सध्या कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 1200 crore works sanctioned without discussion in pune municipal corporation zws

ताज्या बातम्या