scorecardresearch

बारावीच्या परीक्षा होणार, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने विद्यार्थीहित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला.

12th exams to be held
बारावीच्या परीक्षा होणार, उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार (प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाच्या कार्यकारिणीने विद्यार्थीहित लक्षात घेऊन बारावीच्या परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचा निर्णय घेतला. मात्र बारावीच्या उत्तरपत्रिकांची तपासणी, अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट करत महासंघाने जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या आजपासून (१४ मार्च) सुरू होणाऱ्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आजपासून शासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर महासंघाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत बारावीच्या परीक्षेच्या कामाबाबत निर्णय घेण्यात आला.

हेही वाचा – पुणे : महिलेचा विनयभंग करणाऱ्या एकास तीन महिने कारावास

हेही वाचा – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तीन हजार कर्मचारी संपावर; कामकाज ठप्प

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी केलेल्या आवाहनानुसार बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक बिघडू नये, विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा तयारी करावी लागू नये म्हणून परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक महाविद्यालयाची कोणतीही कामे करणार नाहीत हे महासंघाने स्पष्ट केले आहे. राज्य समन्वय समितीने बेमुदत संप आंदोलन मागे घेतल्यानंतरच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक आपला बेमुदत संप मागे घेतील, असे महासंघाचे अध्यक्ष डॉ. संजय शिंदे, समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर, सरचिटणीस प्रा. संतोष फासगे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-03-2023 at 12:09 IST
ताज्या बातम्या