पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपच्या सात आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पाच आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या एक अशा १३ मातब्बर उमेदवारांना ‘नोटा’ (या पैकी कोणीही नाही) मतांचा मोठा फटका बसला आहे. विजयासाठी आवश्यक असलेली मते ‘नोटा’ला गेल्याने  क्रमांक दोनवर राहिलेल्या उमेदवारांना निसटता पराभव स्वीकारावा लागल्याचे मतदानाच्या आकडेवारीवरुन दिसत आहे.

प्रभाग पाचमध्ये भाजपच्या अनुराधा गोफणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या भीमाबाई फुगे यांच्यात चुरशीची लढत झाली. फुगे यांनी १३ हजार ५२३ मते घेत विजय मिळवला, तर गोफणे यांना १२ हजार ७८९ मते मिळाली. त्यांचा ७३४ मतांनी पराभव झाला. या जागेसाठी नोटाला ७५२ मते मिळाली. प्रभाग आठमध्ये भाजपचे डॉ. सुहास कांबळे यांना १२ हजार ६१८ आणि स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीमा सावळे यांना १२ हजार ३६२ मते पडली. सावळे यांचा केवळ २५६ मतांनी पराभव झाला.

नोटाला ६९९ मते पडली. प्रभाग १६ मध्ये भाजपचे धर्मपाल तंतरपाळे आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे बाळासाहेब ओव्हाळ यांच्यात चुरशीची लढत झाली. तंतरपाळे ६७६ मतांनी विजयी झाले. येथे नोटाला १ हजार २७५ मते मिळाली. प्रभाग १९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सविता आसवानी अवघ्या २१ मतांनी विजयी झाल्या. त्यांना ९ हजार ५२५, तर भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे यांना ९ हजार ५०४ मते मिळाली. या जागेसाठी नोटाला पडलेली १ हजार ४२५ मते निर्णायक ठरली. या प्रभागातीलच ‘ड’ जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे काळुराम पवार यांना ३१४ मतांनी पराभव स्वीकारावा लागला. पवार यांना ६ हजार ५५, तर भाजपचे मंदार देशपांडे यांना ६ हजार ३७० मते मिळाली. येथे नोटाला पडलेली मते ६२९ आहेत.

प्रभाग २२ मध्ये भाजपच्या कोमल काळे यांना ९ हजार २९१ मते मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उषा काळे यांना ८ हजार ६१८ मते मिळाली. काळे यांचा ६७३ मतांनी पराभव झाला. नोटाला ९३३ मते मिळाली. प्रभाग २३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगिता बारणे या ८ हजार ४६६ मते घेऊन विजयी झाल्या. भाजपच्या सोनाली गाडे यांना ८ हजार २७ मते मिळाली. ७७२ मतदारांनी नोटाचे बटन दाबले. प्रभाग २७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सागर कोकणे यांनी माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांचा  ६०० मतांनी पराभव केला. कोकणे यांना १४ हजार ९६९, तर नखाते यांना १४ हजार ३६९ मते मिळाली. नोटाला पडलेली मते १ हजार ४०६ आहेत.

प्रभाग ३० मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू बनसोडे यांनी भाजपच्या चंद्रकांता सोनकांबळे यांचा पराभव केला. बनसोडे यांना ८ हजार ७९८, तर सोनकांबळे यांना ८ हजार ८७ मते मिळाली. या प्रभागात ७४२ मतदारांनी नोटाचे बटन दाबले. अवघ्या ७११ मतांच्या फरकाने बनसोडे यांनी सोनकांबळे यांचा पराभव केला. याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिक्षा लांघी-जवळकर यांनी ९ हजार ४८१ मते घेत विजय मिळवला. त्यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या माजी नगरसेविका उषा मुंढे यांना ८ हजार ९४७ मते मिळाली असून त्यांचा ५३४ मतांनी निसटता पराभव झाला.

या जागेसाठी नोटाला १ हजार २१९ मते मिळाली. प्रभाग ३१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिप्ती कांबळे यांना १० हजार ७३६ मते मिळाली. भाजपच्या दुर्गाकौर आदियाल यांना ९९९१ मते पडली. कांबळे ७४५ मतांनी विजयी झाल्या. येथे नोटाने १ हजार ५२८ मते घेतली. याच प्रभागात भाजपचे ज्ञानेश्वर जगताप यांनी अवघ्या ५२३ मताधिक्याने विजय मिळवला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र जगताप यांनी ७ हजार ९८८ मते मिळवली, तर ज्ञानेश्वर यांना ८ हजार ५११ मते मिळाली. नोटाला पडलेली १ हजार ३६ मते आहेत. प्रभाग ३२ मध्ये स्थायी समितीचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल शितोळे यांना अवघ्या २९० मतांनी पराभव स्वीकारावा लागला. भाजपचे प्रशांत शितोळे यांनी ९ हजार ९८६ मते घेऊन विजय मिळवला, तर अतुल यांना ९ हजार ६९६ मते मिळाली. येथे ४५२ जणांनी नोटाचे बटन दाबले.