scorecardresearch

Premium

खडकवासला धरणातून १३ हजार क्युसेकचा विसर्ग कायम ; धरणसाठा ४५ टक्क्यांवर

बुधवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांमधील एकूण पाणीसाठा १३.२१ टीएमसी म्हणजेच ४५.३२ टक्क्यांवर पोहोचला.

khadakwasla-dam
(संग्रहित छायाचित्र)

पुणे : खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून कोसळणारा मुसळधार पाऊस बुधवारीही कायम होता. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला १३ हजार क्युसेकचा विसर्ग बुधवारी कायम ठेवण्यात आला. गेल्या २४ तासांत चारही धरणांमध्ये १.६४ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमा झाला आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत चारही धरणांमधील एकूण पाणीसाठा १३.२१ टीएमसी म्हणजेच ४५.३२ टक्क्यांवर पोहोचला.

गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या धरणांमध्ये ४.४२ टीएमसीने पाणीसाठा जास्त आहे. खडकवासला धरणातून बुधवारी सकाळी सहा वाजता दहा हजार २४६ क्युसेक वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. त्यानंतर सकाळी ११ वाजता हा विसर्ग ५५६४ क्युसेकपर्यंत कमी करण्यात आला. मात्र, खडकवासला धरण परिसरात पावसाची संततधार कायम असल्याने दुपारी तीन वाजल्यापासून पुन्हा १३ हजार १३८ क्युसेकने मुठा नदीपात्रात पाणी सोडण्यास सुरूवात करण्यात आली, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
bachchu kadu eknath shinde 1
“एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावरून हटवल्यास भाजपाचे प्लॅन…” आमदार अपात्रतेवर बच्चू कडूंचं मोठं वक्तव्य
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!

दरम्यान, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस सुरू असल्याने पाणीसाठ्यात चांगलीच वाढ होत आहे. सध्या टेमघर धरण ३० टक्के, वरसगाव आणि पानशेत धरण अनुक्रमे ४२ टक्के आणि ४५ टक्के, तर खडकवासला धरण १०० टक्के भरले आहे. मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण परिसरात १६० मिलिमीटर, वरसगाव धरणाच्या क्षेत्रात ८८ मि.मी., पानशेत धरण परिसरात ९३ मि.मी., तर खडकवासला धरण परिसरात ३८ मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारी दिवसभरात टेमघर धरणक्षेत्रात ८० मि.मी., वरसगाव आणि पानशेत धरण परिसरात अनुक्रमे ८७ आणि ८८ मि.मी., तर खडकवासला धरणक्षेत्रात ४५ मि.मी. पाऊस पडला, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांमध्ये

टेमघर १.१३ ३०.४७

वरसगाव ५.३७ ४१.८८

पानशेत ४.७४ ४४.५१

खडकवासला १.९७ १००

एकूण १३.२१ ४५.३२

नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे हे धरण सोमवारी (११ जुलै) पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे या धरणातून नवीन मुठा उजवा कालव्यातून ९०५ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, तर नदीपात्रातून बुधवारी १३ हजार १३८ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचे प्रमाण पाहून रात्री उशिरा विसर्गात वाढ किंवा कपात करण्यात येणार आहे. मात्र, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडाळकर यांनी केले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-07-2022 at 21:09 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×