मराठी पाटय़ा लावणाऱ्या १५ दुकानदारांचा सत्कार

गोष्ट एका पाटीची.. ही पाटी शाळेत मुळाक्षरे गिरवण्याची नाही, तर दुकानाचे नाव ठळकपणे दर्शविणारी आणि मराठीच्या अभिमानाची.. दुकानाच्या पाटय़ा हा मराठी अस्मितेच्या राजकारणाचा विषय होण्यापूर्वीपासून दुकानाच्या पाटय़ा मराठी असलेल्या व्यापाऱ्यांचा मंगळवारी सत्कार होणार आहे तोही मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून. प्रातिनिधीक स्वरूपातील १५ व्यापाऱ्यांचा सन्मान होत असताना यातील काही दुकानांवर तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून मराठी भाषेतील पाटी अभिमानाने झळकत आहे.

विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यनगरीमध्ये मराठी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. विविध प्रांतातील, भाषेतील लोक येथे वास्तव्य करून व्यापार करीत आहेत, पण प्रत्येकजण आपली मातृभाषा सांभाळून अस्खलितपणे मराठी बोलत आहे. मराठी भाषेचा वापर करून व्यापार क्षेत्रात भरारी घेणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या दुकानांवरील पाटय़ा मराठीमध्येच आहेत. अशा मराठी पाटय़ा अभिमानाने झळकवणाऱ्या दुकानदारांचा सन्मान करण्याचा योग स्टेशनरी, कटलरी आणि अँड जनरल र्मचट्स असोसिएशनने जुळवून आणला आहे.

शनिपार चौकातील मे. गोविंद दाजी जोशी आणि  कंपनी या १३३ वर्षे कार्यरत असलेल्या दुकानापाशी सकाळी अकरा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात कावरे आईस्क्रीम, सह्य़ाद्री औषधी भांडार, सत्यम हॉटेल, स्वानंद एजन्सी, साई, मानसी होजिअरी, दाते आंबेवाले, पूजा भांडार, प्रवदा, नया संसार, गोरे आणि मंडळी, कॉटन किंग, लिनन किंग, वर्धन आणि जीवन जनरल स्टोअर्स या प्रातिनिधीक १५ मराठी पाटय़ा लावणाऱ्या दुकानदारांचा सत्कार होणार असल्याची माहिती असोसिएशनचे अध्यक्ष मदनसिंह रजपूत आणि नितीन पंडित यांनी दिली.

पुण्यात अजूनही मराठी हीच नित्यव्यवहाराची भाषा आहे. त्यामुळे व्यवसायामध्ये मी चौथ्या पिढीचा प्रतिनिधी असलो तरी कधी इंग्रजी भाषेतील पाटी लावण्याचा मोह झाला नाही. मराठी पाटी असल्याचा अभिमान वाटतो, असे गोविंद दाजी जोशी आणि कंपनीचे सचिन जोशी यांनी सांगितले. मराठीचा आणि पुण्याचा अभिमान असल्याने दुकानाची पाटी मराठीमध्येच असल्याचे  शताब्दी पार केलेल्या कावरे आईस्क्रीमचे दत्ताभाऊ कावरे यांनी सांगितले.

‘आयटी’त मराठी, ऐटीत मराठी

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात माहितीची देवाण—घेवाण आपल्या मातृभाषेतून म्हणजेच समजण्यास सोप्या आणि सुलभ मराठीतून व्हावी या उद्देशातून मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने’ (एमकेसीएल) मंगळवारपासून (२७ फेब्रुवारी) ‘आयटीत मराठी—ऐटीत मराठी’ ही कार्यशाळा आयोजित केली आहे. एक तासाची विनामूल्य कार्यशाळा शनिवापर्यंत (३ मार्च) चालणार आहे. इंटरनेटवर मराठीचा वापर वाढवून जगभरातील विविध क्षेत्रांतील ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पटकन समजणाऱ्या सोप्या मराठी भाषेतून उपलब्ध व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे. जागतिकीकरणाच्या जमान्यात मराठी भाषेचा वापर, समृद्धी आणि उन्नतीसाठी योजिलेला उपक्रम सर्व वयोगटातील विद्यार्थी आणि नागरिकांना उपयुक्त आहे. मोबाईलमध्ये मराठीत बोलून टायपिंग, मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून मराठी भाषांतर, ऑनलाईन मराठी शब्दकोश, मराठी भाषेमधून इंटरनेटवर माहिती शोधणे, मराठी विकिपीडियामध्ये मराठी भाषेतून लिहून योगदान देणे ही कौशल्ये या कार्यशाळेत शिकवण्यात येणार आहेत. ही कार्यशाळा महाराष्ट्रातील पाच हजारांहून अधिक एमएस-सीआयटी केंद्रावर विनामूल्य उपलब्ध असून नजीकच्या केंद्राविषयी जाणून घेण्यासाठी ८४११९६०००५ या क्रमांकावर संपर्क साधावा.