‘मला बरे वाटत नाही, डॉक्टरांकडे न्या’ – मुलाचे अखेरचे शब्द

पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीतर्फे नुकतेच हे अवयवदान यशस्वी करण्यात आले.

१५ वर्षीय मेंदूमृत मुलाचे अवयव आई-वडिलांकडून दान

पुणे : संध्याकाळी बाहेर खेळायला गेलेला १५ वर्षांचा लाडका लेक अचानक धापा टाकत घरी आला. वडिलांना म्हणाला, ‘मला त्रास होतोय, अँब्युलन्स बोलवा, डॉक्टरांकडे न्या.’ दुर्दैवाने हेच मुलाचे अखेरचे शब्द ठरले. १५ वर्षांच्या या मुलाला उपचारांदरम्यान मेंदूमृत जाहीर करण्यात आले. शेवटी आई-वडिलांनी त्याचे अवयव दान करत अनेक गरजूंना रुग्णांना जीवदान देत मुलाच्या स्मृती जिवंत ठेवल्या.

पुणे विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीतर्फे नुकतेच हे अवयवदान यशस्वी करण्यात आले. यामध्ये १५ वर्षीय मुलाचे सर्व अवयव दान करत आई-वडिलांनी आपल्या धीरोदात्त वृत्तीचे दर्शन घडवले. १९ ऑक्टोबरला संध्याकाळी इमारतीच्या आवारात सायकल चालवताना धाप लागली म्हणून मुलगा घरी आला. तातडीने रुग्णवाहिका बोलवून त्याला रुग्णालयात दाखल केले. मेंदूतील अंतर्गत रक्तस्रावाचे निदान झाले. शस्त्रक्रिया केली, मात्र धोका टळला नाही. गुंतागुंत वाढल्याने त्याला जहाँगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांना कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्याला मेंदूमृत जाहीर करण्यात आले. मुलाचे वडील आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत, तर आई गृहिणी आहे. त्याला १२ वर्षांची बहीण आहे. त्याचे हृदय मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयातील गरजू रुग्णाला, तर मूत्रपिंड आणि यकृत शहरातील गरजू रुग्णांसाठी देण्यात आले.

मुलाचे वडील म्हणाले, यापूर्वी अनेक रुग्ण अत्यंत गुंतागुंतीच्या परिस्थितीतून बरे झालेले पाहिले होते. त्यामुळे मुलाला बरे करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करायचे एवढेच ठरवले होते. मात्र, तो मेंदूमृत झाल्याचे समजताच सर्व पयार्य संपले. त्यामुळे अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. पत्नीच्या संमतीशिवाय हे करायचे नव्हते. ती केवळ डोळे दान करण्यास तयार होती. मात्र, सुरुवातीचा मानसिक धक्का काहीसा ओसरताच तिनेही सर्व उपयुक्त अवयव दान करण्याची तयारी दर्शवली. माझ्या मुलाचे अवयव ज्या गरजू रुग्णांना दिले, त्या सर्वांवर अवयव प्रत्यारोपण यशस्वी झाले. मुलगा गमावला त्याचे दु:ख कशानेही भरून येणार नाही, मात्र त्याचे अवयव गरजू रुग्णांना बरे करण्यास उपयुक्त ठरले याचे समाधान आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 15 year old brain dead child organ donated parents akp

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार