औंधच्या जिल्हा नागरी रुग्णालयात सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून येत्या एक महिन्यांत आणखी सोळा सीसीटीव्ही कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात येणार आहेत. रुग्णालयांमधून होणाऱ्या अर्भकांच्या चोरीसारख्या घटना व डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार, अतिदक्षता विभाग, शल्यचिकित्सा विभागाचे प्रवेशद्वार, मेट्रो ब्लड बँक, रोगनिदान प्रयोगशाळा या ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनायक मोरे म्हणाले, ‘‘एक महिन्यापूर्वी रुग्णालयात सोळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. रुग्णालयांमधून नवजात बालके पळवणे, बालकांची अदलाबदली करणे, असे प्रकार घडू नयेत हा या कॅमेऱ्यांचा उद्देश आहे. या कॅमेऱ्यांच्या छायाचित्रणाचा दर्जा उत्तम असून त्यांत सुमारे दोन महिन्यांचे रेकॉर्डिग करता येणार आहे. रुग्णालयांत आणखी सोळा कॅमेरे बसवण्याचे कामही सुरू झाले आहे.’’
जिल्हा शल्यचिकित्सक आणि निवासी वैद्यकीय अधिकारी (क्लिनिकल) यांच्या कार्यालयात कॅमेऱ्यांचे छायाचित्रण लाईव्ह बघण्याची सोय करण्यात आली आहे. ‘एव्हिट्रॉन’ कंपनीचे हे स्वयंचलित कॅमेरे हालचालींना प्रतिसाद देणारे म्हणजे ‘मोशन सेन्सर’ प्रकारचे आहेत. समोर कुणीही नसता कॅमेऱ्याचे छायाचित्रण बंद राहात असून हालचाल होताच छायाचित्रण आपोआप सुरू होते. विशेष म्हणजे कॅमेऱ्यांसाठी ‘सोलर बॅकअप’ यंत्रणा वापरण्यात आली असल्यामुळे कॅमेरे कधीही बंद पडणार नाहीत. हे कॅमेरे रात्रीच्या अंधारातही छायाचित्रण करू शकणारे आहेत. कॅमेऱ्यांचे ४०० जीबीचे छायाचित्रण जतन करून ठेवता येणार असून ते ‘डाटा ट्रान्सफर’द्वारे दुसऱ्या संगणकावरही पाहता येणार आहे.