पुणे : पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मंगळवारी गॅस टँकर उलटल्यानंतर २४ तासांहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाल्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना बसला. महामार्गावर दिवसभरात १६३ बस अडकून पडल्याने बुधवारी या मार्गावरून धावणाऱ्या एकूण १३९ बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी, ई-शिवाई आणि ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली.

महामार्गावर अडकून पडलेल्या १६३ बसमध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश होता. काही विभागातील बस बुधवारी पहाटे, दुपारपर्यंत शेवटच्या स्थानकावर पोहोचल्या असून, निम्म्याहून अधिक बस अडकूनच पडल्याचे एसटी महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील ओडोशी बोगद्याजवळ मंगळवारी (३ फेब्रुवारी) सायंकाळी पाच वाजता ‘प्रोपलेन गॅस टँकर’ उलटला. यातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने महामार्ग पोलिसांनी तातडीने मुंबई-पुण्याच्या दिशेने येणारी-जाणारी वाहतूक बंद केली.

त्यामुळे मुंबईतून निघालेल्या सातारा, पुणे, कोल्हापूर, सांगली मार्गावीरल बस अडकून पडल्या. तर, मुंबई, ठाणे, पालघर, बोरिवली, दादर या मार्गावरील बसही अडकून पडल्याने पुन्हा माघारी वळविण्यात आल्या. बसमधील प्रवाशांना तासोंतास अडकून पडावे लागल्याने ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांची प्रचंड गैरसोय झाली. त्यामुळे दिवसभरातील विविध मार्गावरून येणाऱ्या-जाणाऱ्या १३९ बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या.

सर्वाधिक इलेक्ट्रिक बसमुळे निर्णय

एसटी महामंडळाच्या पुणे-मुंबई मार्गावरील सर्वाधिक बस इलेक्ट्रिक आहेत. सलग सुट्यांच्या दिवशी या मार्गावर वाहतूककोंडी होत असल्याने इलेक्ट्रिक बसला मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. दीर्घ काळ वाहतूककोंडीत अडकल्याने झपाट्याने चार्जिंग संपण्याच्या घटना घडतात. ही परिस्थिती पाहून एसटी महामंडळाने दिवसभरातील या मार्गावर धावणाऱ्या बसची सेवा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे एसटी प्रशासनाने नमूद केले.

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जाण्याची शक्यता लक्षात घेऊन बुधवारी दिवसभरातील ४२ बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या. या मार्गावरील वाहतूक खुली झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने वेळापत्रकानुसार सेवा सुरू करण्यात येईल.- अभिजित भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ