पुण्यातल्या हडपसर भागातील फुरसुंगी येथे सहा सराईत गुन्हेगारांकडून १८ गावठी पिस्तूलं आणि २७ जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई हडपसर पोलिसांमार्फत करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अरबाज रशीद खान (वय २१, रा. शिरुर), सुरज रमेश चिचणे ऊर्फ गुळया (वय २२, फुरसुंगी), कुणाल नामदेव शेजवळ ऊर्फ यश (वय १९, रा. शिरुर), जयेश राजू गायकवाड ऊर्फ जय (वय २३, रा. शिरुर), विकास भगत तौर ऊर्फ महाराज (वय २८, रा. येरवडा), शरद बन्सी मलाव (वय २१, रा. शिरुर) या सहा सराईत गुन्हेगारांना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी माहिती देताना पोलीस उपायुक्त बावचे म्हणाले, “हडपसर येथील फुरसुंगी परिसरातील कानिफनाथ वस्तीजवळ पाच ते सहा जणांच्या कमरेला पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे घटनास्थळी धाव घेऊन या सहा जणांकडे चौकशी केली केल्यानंतर त्यांच्याकडे १८ गावठी पिस्तूलं, २७ जिवंत काडतुसं, एक चोरीची दुचाकी आणि ५ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही सर्व पिस्तूलं मध्य प्रदेशातून आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे कोणाला देण्यासाठी आणली याबाबत त्यांच्याकडे पोलीस चौकशी करीत आहेत. हे सर्वजण सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या सर्व आरोपींना न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांना २२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. त्याचबरोबर उपनगरात एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा सापडल्याने यामध्ये आणखी काही जण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.