अवैध वाळू वाहतूक करणारी १८ वाहने जप्त

देहुरोड तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई करून ती जप्त करण्यात आली. ती आकुर्डी तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आली आहेत. 

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या अठरा वाहनांवर पिंपरी अप्पर तहसील कार्यालयाने गेल्या दोन दिवसांत कारवाई केली. देहुरोड तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत ही कारवाई करण्यात आली.

पिंपरी महसूल कार्यालयाच्या हद्दीमध्ये अवैध वाळू वाहतूक व विक्री होत असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर पिंपरी अप्पर तहसील कार्यालयाच्या पथकाने विनापरवाना वाळू, माती आणि मुरुमाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. ही कारवाई गेले दोन दिवस सलगपणे सुरू होती. अप्पर तहसीलदार प्रशांत बेडसे, नायब तहसीलदार संजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.

कारवाईत देहुरोड येथे १८ वाहने ताब्यात घेण्यात आली. कारवाई करण्यात आलेले डंपर पिंपरी अप्पर तहसील कार्यालयाच्या आवारात तसेच देहुरोड पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले आहेत. जप्त करण्यात आलेल्या डंपरमधील गौण खनिजांची किंमत आणि दंडाच्या रकमेची माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात संपर्क केला असता माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. गेल्या तीन महिन्यांपासून थंडावलेली कारवाई अचानक सुरू झाली असून त्यात यापुढे सातत्य राहण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 18 vehicles seized of illegal sand transport