पिंपरी : ‘जल ही अमृत’ उपक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना (एसटीपी) तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) मिळाले आहे. या केंद्रांना केंद्र आणि राज्य सरकारकडून ३८ काेटी ५० लाखांचे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात ३७६ दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेची १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रे कार्यरत आहेत. ही केंद्रे १९८७ पासून ते २०२५ पर्यंत विविध कालखंडात कार्यान्वित झाली आहेत. केंद्र सरकारने ‘अमृत २.०’ योजनेअंतर्गत ‘जल ही अमृत’ हा उपक्रम राबविला होता. ऑक्टोबर २०२४ आणि जानेवारी २०२५ मध्ये दोन टप्प्यांमध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पाहणी झाली. यामध्ये युनिट ऑपरेशन, देखभाल यंत्रणा, डिस्चार्ज मानके, स्वच्छता, कर्मचारी व्यवस्थापन, बायोसॉलिड्स पुनर्वापर, पर्यायी ऊर्जा वापर व नावीन्यपूर्ण उपाय अशा विविध निकषांचा समावेश होता.

त्यात महापालिकेच्या सर्व १९ सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी उल्लेखनीय कामगिरी करून पाच, चार, तीन तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) मिळवले आहे. सर्वच प्रकल्पांना पंचतारांकित मानांकन मिळवून देणे हे ध्येय असून, यासाठी आगामी काळात आमचा प्रयत्न राहणार असल्याचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, या कामगिरीनिमित्त सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये कार्यरत १७ यंत्रचालक, नऊ रसायनतज्ज्ञांचा आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहर परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन एकात्मिक सांडपाणी कृती आराखडा तयार केला आहे. शहरातील सांडपाण्याचा जास्तीत जास्त पुनर्वापर कशा पद्धतीने करता येऊ शकतो, यासाठी नियोजन सुरू आहे.- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका