Pune Girl Student Pakistan Zindabad post: इन्स्टाग्रामवर पाकिस्तान जिंदाबाद अशी कमेंट केल्याबद्दल पुणे शहर पोलिसांनी एका १९ वर्षीय विद्यार्थीनीला अटक केली आहे. शुक्रवारी कोंढवा पोलीस ठाण्यात हवालदार सुभाष जरांडे यांनी याबद्दल एफआयआर दाखल केला. त्यानंतर पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी विद्यार्थीनीला अटक केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. तसेच पुढील तपास सुरू असल्याचेही ते म्हणाले.

पुण्यातील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीला अटक करून तिच्यावर भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम १५२, १९६, १९७, २९९, ३५२, ३५३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात सशस्त्र कारवाई सुरू केल्यानंतर पोलिसांकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात येत होते. यादरम्यान पोलिसांना सदर आक्षेपार्ह कमेंट आढळून आली. यानंतर पोलिसांनी कोंढवा परिसरातील कौसरबाग येथे राहत असलेल्या विद्यार्थीनीला अटक केली. दरम्यान सकल हिंदू समाजाकडून आंदोलन करण्यात येत असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाची सुरुवात झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सूचनेनुसार सोशल मीडियावर तपास यंत्रणा करडी नजर ठेवून आहेत. खोटा नरेटिव्ह पसरविणाऱ्या आणि भारत किंवा लष्कराविरोधात भूमिका मांडणाऱ्या अनेक खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एक्सवरील तब्बल ८००० खाती केंद्र सरकारच्या आदेशानंतर बंद करण्यात आली आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया तसेच इतर माध्यमांकडून मोठ्या प्रमाणात खोट्या बातम्या परसरवल्या जात आहेत. तणावाच्या काळात खोटी माहिती पसरू नये या पार्श्वभूमीवर सरकारकडून काही उपाय योजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून सरकारने नागरिकांना फेक न्यूज बद्दल जागृत करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. राज्य सरकारडून अशा ‘फेक न्यूज’बद्दल तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअॅप क्रमांक आणि इमेल आयडी देण्यात आला आहे.