scorecardresearch

कसब्यात ८० वर्षांपुढील १९ हजार मतदार, ४९ जणांची टपाली मतदानासाठी नोंदणी

निवडणूक आयोगाने वय वर्षे ८० पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

pv voter 60 plus age

पुणे : निवडणूक आयोगाने वय वर्षे ८० पेक्षा जास्त वय असणाऱ्या मतदारांसाठी प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार कसबा मतदार संघात १९ हजार मतदार ८० पेक्षा जास्त वय असणारे मतदार आहेत. आतापर्यंत ४९ जणांनी टपाली मतदान करण्यासाठी अर्ज सादर केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार सुविधाकेंद्रित निवडणुकांवर भर दिला आहे. मतदानाची टक्केवारी वाढण्याच्यादृष्टीने कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघांच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाकडून घरोघरी जाऊन ज्येष्ठ नागरिक, शारीरिक विकलांग नागरिक आदींसाठी मतदानासाठी उपलब्ध सुविधांची माहिती देण्यात येत आहे. सर्व स्तरातील मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्यात सहभाग घ्यावा, यासाठी निवडणूक आयोगाकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याअंतर्गत कसबा, चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, यासाठी ८० वर्षेपेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांच्या तसेच शारीरिक विकलांग मतदारांच्या घरी जाऊन निवडणूक अधिकारी जनजागृती करत आहेत.

दरम्यान, ८० वर्षे पेक्षा जास्त वय असणाऱ्या तसेच शारीरिक विकलांग मतदारांसाठी निवडणूक आयोगाने प्रथमच घरामधून टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यासाठी अशा मतदारांकडून मतदार नोंदणी करणारे अधिकारी, कर्मचारी प्रत्यक्ष अशा मतदारांच्या घरी जाऊन इच्छुकांकडून ‘नमुना १२-डी’ नमुना अर्ज भरून घेत आहेत. अशाप्रकारचा अर्ज कसब्यातून आतापर्यंत ४९ नागरिकांनी भरून दिला आहे. कसबा मतदारसंघात ८० पेक्षा जास्त वय असणारे १९ हजार मतदार आहेत. जास्तीतजास्त अशा मतदारांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, त्याकरिता नमुना १२-डी अर्ज भरून देण्याचे आवाहन पुणे शहरच्या तहसीलदार राधिका हावळ-बारटक्के यांनी केले आहे.

विशेष मतदारांसाठी सुविधा

शारीरिक विकलांग मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी चाकाची खुर्ची (व्हीलचेअर), अंध मतदारांसाठी ब्रेल लिपीचा समावेश असलेले मतदान यंत्र (ईव्हीएम), घरापासून मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. याबाबत चिंचवड विधानसभा मतदार संघात प्रबोधन करण्यात आल्याची माहिती समन्वयक अधिकारी अजय पवार यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-02-2023 at 00:02 IST
ताज्या बातम्या