चोरीच्या पैशातून केलेली मौजमजा अंगलट; १४ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या मामा-भाच्याला पुणे पोलिसांकडून सहा महिन्यानंतर अटक

आरोपीकडे भरपूर पैसे आले असून त्याने मोटार तसेच दुचाकी खरेदी केल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली

pune police arrest 2
खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली कारवाई (प्रातिनिधिक फोटो)

सहा महिन्यांपूर्वी हडपसर भागातील एका घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी साडेचौदा लाखांचा ऐवज लंपास केला होता. चोरलेल्या दागिन्यांच्या विक्रीतून चोरट्यांनी महागड्या वस्तू खरेदी करण्यास सुरूवात केली. खबऱ्याने दिलेल्या माहितीमुळे चोरीच्या गुन्हा उघडकीस आला असून या प्रकरणात वानवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तसेच चोरट्यांकडून दागिने विकत घेणाऱ्या सराफालाही गजाआड करण्यात आले.

या प्रकरणी नितीन उर्फ दया विश्वास पोळ (वय ३३) आणि त्याचा भाचा साहील खंडु पेठे (वय २०, दोघे रा. तरवडे वस्ती, हडपसर) यांना अटक करण्यात आली. दोघांकडून चोरलेले दागिने विकत घेणारा सराफ रोहित संजय पंडीत (वय ३७, रा. ससाणेनगर, हडपसर) यालाही अटक करण्यात आली. याबाबत रंगनाथ सदाशिव शिंदे (वय ५५, रा. साठेनगर, तरवडे वस्ती) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

शिंदे जागरण गोंधळाचा कार्यक्रम करतात. त्यांनी दागिने व रोकड असा १४ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज घरातील दोन स्टीलच्या डब्यांमध्ये ठेवला होता. ऐवज ठेवलेले दोन डबे त्यांनी दिवाणात लपवून ठेवले होते. १६ ऑक्टोबर २०२१ रोजी ऐवज ठेवलेले डबे चोरीला गेल्याचे उघडकीस आले होते.

या प्रकरणाचा वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत होता. आरोपी नितीन पोळ याच्याकडे भरपूर पैसे आले आहेत. त्याने मोटार तसेच दुचाकी खरेदी केल्याची माहिती तपास पथकातील पोलीस कर्मचारी सर्फराज देशमुख आणि संतोष नाईक यांना मिळाली. पोलिसांनी पोळला ताब्यात घेतले. चौकशीत पोळ आणि त्याचा भाचा साहिल पेठेने शिंदे यांच्या घरातून ऐवज ठेवलेले डबे लांबविल्याची कबुली दिली.

चोरलेल्या दागिन्यांची विक्री सराफ रोहित पंडीत याला केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यालाही अटक करण्यात आली. पंडीत याच्याकडून सहा लाख ४० हजारांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरोपी पोळ आणि पेठेकडून दुचाकी आणि मोटार जप्त करण्यात आली.

चोरीच्या पैशातून पिस्तुल खरेदी
दागिने विक्रीतून मिळालेल्या पैशांमधून आरोपी पेठेने देशी बनावटीचे पिस्तुल खरेदी केले होते. एका गुंडाला जामीन मिळवून देण्यासाठी पेठेने एका मित्राला एक लाख रुपये दिल्याची माहिती तपासात मिळाली आहे. काही महिन्यांपूर्वी पेठेला बेकायदा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. तेव्हा पोलिसांकडून करण्यात आलेल्या चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली नव्हती.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 2 arrested by police in 14 lakh robbery case pune print news scsg

Next Story
राज्यातील अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याचे आदेश
फोटो गॅलरी