येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात किरकोळ कारणावरून एका मनोरुग्णाकडून करण्यात आलेल्या मारहाणीमध्ये दोन मनोरुग्णांचा मृत्यू होण्याची खळबळजनक घटना बुधवारी रात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित मनोरुग्णावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दीपक अर्जुन सुरवसे (वय २८) असे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. या घटनेमध्ये बाबुराव पांडुरंग लांडगे (वय ३८), शमशुद्दीन सावजी भानवाडिया (वय ५२) या दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी रुग्णालयातील परिचारक राजू बापुराव धिवार (वय २९, रा. खांदवे वस्ती, लोहगाव रस्ता) यांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरवसे याच्यासह लांडगे व भानवाडिया हे तिघेही इतर रुग्णांसोबत रुग्णालयाच्या नव्या रुग्णांच्या निरीक्षण विभागात उपचार घेत होते. बुधवारी रात्री लांडगे यांनी सुरवसे याच्या अंगावरील चादर ओढल्याचे निमित्त झाले. चादर ओढल्यानंतर सुरवसे याला प्रचंड राग आला. त्यातच भानवाडिया यांनीही त्याला याच कारणावरून चिडवले. त्यानंतर सुरवसे याने दोघांना मारहाण करण्यात सुरुवात केली. सुरवसे याने लांडगे यांचे डोके फरशीवर आपटले. भानवाडिया यांचा गळा दाबला व त्यांचेही डोके फरशीवर आपटले. त्यानंतर त्याने दोघांनाही खाली पाडून लाथा-बुक्क्य़ांनी मारहाण केली. घटनेच्या वेळी इतर रुग्णही नव्या रुग्णांच्या निरीक्षण विभागामध्ये उपस्थित होते.
घटना प्रत्यक्ष घडत असताना तेथे रुग्णालयाचे कोणीही उपस्थित नव्हते. मात्र काही वेळातच कर्मचाऱ्यांच्या पाहणीदरम्यान मारहाणीचा हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तातडीने लांडगे व भानवाडिया यांची तपासणी करण्यात आली. मात्र त्यांचा विभागातच मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सुरवसे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याचा जबाब नोंदवून घेतला आहे.
सुरवसे हा एका कंपनीत कामाला होता. १२ नोव्हेंबरला त्याला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. भानवाडिया हे तीन वर्षांपूर्वी इस्टेट एजंट म्हणून काम करीत होते. काही दिवसापासून त्यांचे मनोस्वाथ्य ठीक नव्हते. त्यामुळे त्यांना १९ नोव्हेंबरला मनोरुग्णालयात दाखल केले होते. लांडगे यांना १३ नोव्हेंबरला या मनोरुग्णालयात दाखल केले होते.
पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी याबाबत सांगितले की, मनोरुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत. या घटनेमध्ये मनोरुग्णालयाच्या काही त्रुटी असतील, तर त्याबाबत तपास केला जाईल.