प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथे वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत २७५ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न सापडले आहे. आयकर विभागाने खाण मशिन आणि क्रेन यांसारख्या अवजड यंत्रसामग्री बनवणाऱ्या पुण्यातील एका व्यावसायिक समूहावर छापे टाकले होते. त्यांच्याकडेच सुमारे २०० कोटी रुपयांहून अधिकचे अघोषित उत्पन्न सापडले आहे, असा दावा सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसने मंगळवारी केला आहे. ११ नोव्हेंबर रोजी देशातील सात शहरांमधील २५ ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती.

“या छापेमारीत १ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि दागिने जप्त करण्यात आले आहेत आणि तीन बँक लॉकर्स बंद करण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक डेटाच्या रूपात अनेक दस्तऐवज आणि साहित्य जप्त करण्यात आले होते. त्यांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की क्रेडिट नोट्सद्वारे विक्री कमी करणे, खर्चाचा बोगस दावा अशा विविध गैरप्रकारांचा अवलंब करून कंपनी आपला नफा लवपत आहे. तसेच न वापरलेल्या मोफत सेवांवरील खर्चाचा दावा, संबंधित लोकांना पडताळणी न करता येणारे कमिशन खर्च, महसूल चुकीच्या पद्धतीने पुढे ढकलणे आणि घसाराबाबत चुकीचे दावे करून नफा लपवला आहे,” असं सीबीडीटीने एका निवेदनात म्हटलंय.

याशिवाय, प्राप्तिकर विभागाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील तीन वेगवेगळ्या रिअल इस्टेट व्यवसाय समूहांवर छापे टाकल्यानंतर ७५ कोटी रुपयांचे अघोषित उत्पन्न शोधले आहे, असे CBDT ने सांगितले.