पुणे : नव्या वर्षातील (२०२६मध्ये) नोकरदारांचा सुट्ट्यांबाबत हिरमोड होणार आहे. कारण, वर्षभरात जोडून सुट्ट्या केवळ चार वेळाच आल्या असून, मार्चमध्ये रविवारसह सर्वाधिक १० सुट्ट्या मिळणार आहेत.
डिसेंबर महिना सुरू झाल्यावर नव्या वर्षाचे वेध लागतात. त्यात प्रामुख्याने नोकदारांकडून दिनदर्शिकेत जोडून येणाऱ्या सुट्ट्या, सणासुदीच्या सुट्ट्या आवर्जून तपासतात. सुट्ट्यांचा आढावा घेऊन वर्षभरातील सहली, भटकंती, घरातील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येते.
२०२६मधील सुट्या, सणासुदीची वैशिष्ट्ये गणित अभ्यासक दीनानाथ गोरे यांनी अधोरेखित केली. २०२६मध्ये २६ तारखेलाच रविवारसह सर्वांत जास्त सहा सुट्ट्या असणार आहेत. त्यात २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन, २६ मार्चला श्रीराम नवमी, २६ एप्रिलला रविवार, २६ जुलैला रविवार, २६ जूनला मोहरम, तर २६ ऑगस्टला ईद-ए-मिलादची सुटी असणार आहे. त्याशिवाय २६ सप्टेंबर आणि २६ डिसेंबरला चौथा शनिवार येत आहे.
जोडून आलेल्या सुट्ट्यांचा आढावा घेतला असता, रविवारला जोडून प्रजासत्ताक दिनाची (२६ जानेवारी) सुटी सोमवारी, गणेश चतुर्थीची (१४ सप्टेंबर) सुटी सोमवारी येत आहे. तसेच २१ मार्च रोजी रमजान ईद, १५ ऑगस्ट रोजीचा स्वातंत्र्य दिन शनिवारी येत आहे.
तसेच वर्षभरात ६ सुट्ट्या मंगळवारी येत आहेत. त्यात १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, २० ऑक्टोबर रोजी दसरा, १० नोव्हेंबरला दिवाळी पाडवा, २४ नोव्हेंबर रोजी गुरू नानक जयंती, ३ मार्च रोजी धूलिवंदन, तर ३१ मार्च रोजी महावीर जयंती असणार आहे. त्याशिवाय १ मे, २ ऑक्टोबर आणि २५ डिसेंबर या सुट्या २००९ आणि २०१५ सालाप्रमाणेच २०२६मध्येही शुक्रवारी असणार आहेत.
गुड फ्रायडे (३ एप्रिल) आणि मोहरम (२६ जून) शुक्रवारी येत असल्याने वर्षभरात पाच सार्वजनिक सुट्या शक्रवारी मिळणार आहेत. तर वर्षभरात चार सुट्या अन्य सुटीच्या दिवशीच येत आहेत. त्यात १५ फेब्रुवारीला महाशिवरात्र रविवारी, ८ नोव्हेंबरला लक्ष्मीपूजन रविवारी, १५ ऑगस्ट रोजी पारसी नववर्ष, तर बुद्ध पौर्णिमा महाराष्ट्र दिनी ( १ मे) येत आहे, असे गोरे यांनी सांगितले.
चालू शतकात तिसऱ्यांदा वर्षाचा प्रारंभ, समारोप गुरुवारी
२०२६ची दिनदर्शिका २००९ आणि २०१५ सालाप्रमाणे असणार आहे. २०२६च्या दिनदर्शिकेतील तारीख आणि वार २००९ आणि २०१५ प्रमाणेच असणार आहेत. चालू शतकात तिसऱ्यांदा वर्षाचा प्रारंभ (१ जानेवारी) आणि समारोप (३१ डिसेंबर) गुरुवारीच होणार आहे. तसेच २००७ प्रमाणेच १५ मे ते १५ जून या कालावधीत ज्येष्ठ महिना येत आहे, असेही गोरे यांनी सांगितले.
