पिंपरी: काही दिवसांपूर्वी मुलाचे निधन झाले असल्याने घरासमोरून गणपतीची मिरवणूक जाताना डीजे वाजवू नका म्हटल्याने २१ जणांनी काट्या, कोयते, लोखंडी सळईने, लाथा बुक्यांनी एका कुटुंबाला मारहाण केली. घरावर हल्ला केला. ही घटना सोमवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता सोमाटणे फाटा येथील शिंदे वस्तीत घडली. याप्रकरणी २१ जणांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत सुनील प्रभाकर शिंदे (वय ३८, रा. सोमाटणे फाटा) यांनी तळेगावदाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील बंदा रजपूत (वय २८), मुकेश करसन रजपुत (२६), रवी करसन रजपुत (३०), सनी करसन रजपुत (३२), प्रवीण करसन रजपुत (३०), अक्षय ज्ञानेश्वर काकडे (२८), अतुल वेलसी रजपुत (२१), कृष्णा बलभीम खराते (२३), रवी हिरा रजपुत (२८), संदीप रमेश रजपुत (२९), विशाल काळुराम रजपूत (२९), संतोष काळुराम रजपूत (२५), विलास हिरा रजपूत (२२), अनिल हिम्मत रजपूत (३१), करसन जयंती रजपूत (५०), दिपक हिम्मत रजपूत (३२), आकाश अशोक रजपूत (२१), काळुराम भिका रजपूत (५५), वसंत भिका रजपूत (५१), अमित वेलसी रजपूत (२४) आणि रमेश जयंती रजपूत (५०, सर्व रा. शिंदेवस्ती, सोमाटणे फाटा) यांना अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा… गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज; विसर्जन घाटांवर विविध सुविधा
फिर्यादी शिंदे यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे गणपती मिरवणुकीदरम्यान घरासमोर ‘डीजे वाजवू नका, पुढे जावून वाजवा’ असे शिंदे यांनी आरोपींना सांगितले. त्यानुसार आरोपींनी वाद्य वाजविण्याचे बंद केले. पण, गणपती विसर्जन करुन परत जाताना वाद्य बंद करायला लावल्याच्या रागातून फिर्यादी शिंदे, त्यांचा भाऊ गणेश शिंदे, आई सुरेखा शिंदे, वडील सदाशिव शिंदे, वाहन चालक जन्मराज कांबळे, मित्र किरण येवले यांना काठ्यांनी, कोयते, लोखंडी सळई, लाथा बुक्यांनी बेदम मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने घरावर हल्ला करुन गंभीर जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 people arrested for beating up a family during ganesh visarjan in pimpri pune print news ggy 03 dvr