पिंपरी : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी राज्यातील ११४८ पोलिसांना 'विशेष सेवा पदक' जाहीर केले. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील २० अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारक आळा घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना दरवर्षी महासंचालकांकडून 'विशेष सेवा पदक' दिले जाते. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला या पदकांची घोषणा केली जाते. पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील दोन पोलीस निरीक्षक, १८ पोलीस उपनिरीक्षक आणि एक पोलीस कर्मचारी अशा २१ जणांना हे पदक जाहीर झाले आहे. हेही वाचा >>> Sushma Andhare : “विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे पैसे सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी वळवले”, सुषमा अंधारेंचा शिंदे सरकारवर आरोप; म्हणाल्या… शिरगाव पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तेजस्विनी कदम यांनी नक्षलग्रस्त भागात साडेतीन वर्ष सेवा केली आहे. त्यामुळे त्यांना 'विशेष सेवा पदक' जाहीर झाले आहे. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी गोंदिया येथे सेवा केली असून त्यांना देखील हे पदक जाहीर झाले आहे. त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सागर देवकर, महेश सातपुते, मिलिंद कुंभार, गणेश आटवे, विठ्ठल सूर्यवंशी, सोहन धोत्रे, बालाजी मेटे, संतोष जायभाये, श्रीकिशन कांदे, दतात्रय सुकाळे, श्रीकांत गुरव, महादेव भालेराव, आबा कटपाळे, राहुल दुधमल, लक्ष्मण मोगले, अनिल टार्फे, चंद्रशेखर मोरखंडे, राजेंद्र पानसरे आणि पोलीस शिपाई योगेश्वर कोळेकर यांना 'विशेष सेवा पदक' जाहीर झाले आहे.