तुला सिनेमात काम मिळून देतो,असे सांगून अमित प्रेमचंद सीटलानी या दिग्दर्शकाने २१ वर्षीय तरुणीवर सलग पाच वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्थानकामध्ये आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२१ वर्षीय पीडित तरुणी आणि आरोपी अमित प्रेमचंद सीटलानी यांची २०१८ च्या दरम्यान कामानिमित्त ओळख झाली. तुला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळून देतो. आपण एकत्रित काम करुयात,असे त्या तरुणीला आरोपीने सांगितले. त्यामुळे तिचा आरोपीवर विश्वास बसला. तेव्हापासून आजपर्यंत आरोपीने या तरुणीला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या काळात तिने मला काम केव्हा मिळेल?, अशी विचारणा केल्यावर आरोपी तिला तुला लवकरच काम मिळेल,असं सांगायचा.

आरोपी अमित प्रेमचंद सीटलानीकडून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या तरुणीने त्याला कामासंदर्भात जाब विचारला. त्यावर, “तुझे माझ्याकडे अनेक व्हिडिओ आहेत. ते मी व्हायरल करेन,” अशी धमकी दिली आणि तिला मारहाण देखील केली. या घटनेनंतर पीडित तरुणीने पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी तातडीने आरोपी अमित प्रेमचंद सीटलानी विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती दिलीय.