scorecardresearch

पुणे : जिल्ह्यातील २२ धरणे काठोकाठ पिण्याचे पाणी, शेतीची वर्षभराची चिंता मिटली

जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल २२ धरणे काठोकाठ भरली आहेत.

पुणे : जिल्ह्यातील २२ धरणे काठोकाठ पिण्याचे पाणी, शेतीची वर्षभराची चिंता मिटली
खडकवासला धरण(संग्रहीत छायाचित्र)

जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल २२ धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची, शेतीसाठीच्या पाण्याची वर्षभराची चिंता मिटली आहे. या पूर्ण क्षमतेने भरलेल्या सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा >>> पिंपरी : नदीकाठच्या रहिवाशांनी सतर्क राहावे ; पालिका आयुक्तांचे आवाहन

पुणे जिल्ह्यात तब्बल २६ धरणे आहेत. त्यापैकी २२ धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली असून उर्वरित धरणांमध्येही समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला ही धरणे यापूर्वीच १०० टक्के भरलेली आहेत. भामा आसखेड धरणही १०० टक्के भरले असून या धरणातून शहराच्या पूर्वभागाला काही प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येतो. पिंपरी-चिंचवड शहर व परिसराला पाणीपुरवठा करणारे पवना धरणही काठोकाठ भरले आहे. जिल्ह्यातील इतर धरणांपैकी डिंभे, विसापूर, वडज, चिल्हेवाडी, कळमोडी, चासकमान, वडीवळे, आंद्रा, कासारसाई, मुळशी, गुंजवणी, निरा देवघर, भाटघर, वीर, नाझरे आणि उजनी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे या धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

हेही वाचा >>> खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गात ५१३८ क्युसेकपर्यंत कपात

चार धरणे भरण्याची अद्याप प्रतीक्षा
जिल्ह्यातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव आणि घोड ही चार धरणे अद्याप पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. पिंपळगाव जोगे ९२ टक्के, माणिकडोह ८० टक्के, येडगाव ९० टक्के, तर घोड धरण ९५ टक्के भरले आहे. मात्र, सध्या पिंपळगाव जोगे आणि घोड धरणातून ४०७० क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे, असेही जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या