गायन, वादन, नृत्यासह विविध कला आणि क्रीडाप्रकारांचा अनोखा मिलाफ असलेला पुणे फेस्टिव्हल यंदा रौप्यमहोत्सवी वर्षांत पदार्पण करीत आहे. केंद्रीय दूरसंचार आणि कायदामंत्री कपिल सिब्बल यांच्या हस्ते १३ सप्टेंबर रोजी रौप्यमहोत्सवी पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सायंकाळी साडेचार वाजता होणाऱ्या कार्यक्रमास पर्यटनमंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री नारायण राणे, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार सुरेश कलमाडी आणि रौप्यमहोत्सव समितीच्या प्रमुख हेमा मालिनी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. उद्घाटनाच्या कार्यक्रमात ईशा आणि आहना यांच्यासमवेत हेमा मालिनी यांनी सादर केलेली गणेशवंदना, अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर आणि ईशा कोप्पीकर यांचे लावणीनृत्य होणार आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र सिंग, बैलगाडा शर्यतीचे संयोजक ज्ञानोबा लांडगे आणि सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाचे आयोजन करणारे आर्य संगीत प्रसारक मंडळ यांना ‘पुणे फेस्टिव्हल अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित केले जाणार आहे. तर शताब्दी साजरे करणाऱ्या लष्कर परिसरातील श्रीपाद सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रतापराव गोडसे स्मृती जय गणेश पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. गेली दोन दशके पुणे फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणाऱ्या हेमा मालिनी १४ सप्टेंबर रोजी ‘राधा रासबिहारी’ हा बॅले सादर करणार आहेत. पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, सेल्वा गणेश, यू. श्रीनिवास, श्रीधर पार्थसारथी, रामकुमार मिश्रा आणि शुभंकर बॅनर्जी यांचा सहभाग असलेला ‘पंचतत्त्व’ हा कार्यक्रम, जतीन-ललित संगीतकार जोडीतील ललित पंडित यांची बॉलिवूड म्युझिकल नाईट, उर्दू मुशायरा, हिंदू हास्य कविसंमेलन असे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती कृष्णकांत कुदळे यांनी दिली.
आय विल कम बॅक
‘पुणे फेस्टिव्हल’च्या माध्यमातून राजकीय पुनरागमनाचा प्रयत्न आहे काय, असे विचारले असता, खासदार सुरेश कलमाडी म्हणाले, पुनरागमनाचा प्रश्नच येत नाही. गेली ३० वर्षे मी लोकसभेवर, तर कधी राज्यसभेवर आहे. आताही मी पुन्हा परत येईन.
महिलांवर होणारे अत्याचार ही
शरमेची बाब – हेमा मालिनी
मुंबईतील शक्ती मिल परिसरामध्ये नुकतीच घडलेली घटना निंदनीय असल्याचे मत हेमा मालिनी यांनी व्यक्त केले. मुंबईमध्येच काय, पण देशामध्ये कुठेही मुली आणि महिलांवर होणारे अत्याचार ही शरमेची बाब आहे. अशा मोकळय़ा जागा सरकारने तातडीने बंद करायला हव्यात. महिलांवर अत्याचार होऊ नयेत म्हणून पोलिसांनी सजग राहिले पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांनीही अशा ठिकाणी जाताना खबरदारी घेतली पाहिजे. द्रौपदी संकटामध्ये असताना भगवान श्रीकृष्ण तिच्या मदतीला धावून गेले. आता काही प्रत्यक्ष भगवान येणार नाहीत, त्यामुळे महिलांनी आपल्या सुरक्षेविषयी जागरूक असायला हवे.