पुण्यात बसविण्यात आलेले २५० कॅमेरे बंद

महापालिकेच्या विद्युत विभागाकडून शहरात ३ हजार ३९३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत

पुणे : नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहराच्या विविध भागात बसविण्यात आलेले २५० सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे स्पष्ट झाले असतानाच नव्याने २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. नगरसेवकांच्या मागणीमुळे सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया महापालिकेच्या विद्युत विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.

शहरातील वाढती गुन्हेगारी, अपघातांवर लक्ष ठेवण्याबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी महापालिकेने शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलीस नियंत्रण कक्षाकडे सोपविण्यात आले आहे. महापालिकेच्या विद्युत विभागाकडून शहरात ३ हजार ३९३ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यापैकी ३ हजार १४३ सीसीटीव्ही कॅमेरेच सुरू असल्याची माहिती विद्युत विभागाकडून देण्यात आली. मात्र बंद सीसीटीव्ही दुरुस्त करण्याऐवजी नगरसेवकांच्या मागणीनुसार नव्याने आणखी २०० सीसीटीव्ही कॅमेरे बसिवण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे.

प्रभागात सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, अशा प्रकारचे शेकडो प्रस्ताव नगरसेवकांकडून विद्युत विभागाला दिले जात आहेत. त्यानुसार सध्या पहिल्या टप्प्यात दोनशे सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. मात्र नादुरुस्त सीसीटीव्ही दुरुस्त करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. सीसीटीव्ही बसविण्यात आल्यानंतर महापालिकेकडूनही त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी झटकली जात असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागात सर्वाधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कसबा-विश्रामबाग वाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत सर्वाधिक ४११ सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यापैकी ३९५ सीसीटीव्ही कार्यरत आहेत, असा दावा विद्युत विभागाकडून करण्यात आला आहे. कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयानंतर कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालायाच्या हद्दीत २७१ सीसीटीव्ही तर बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत २६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कात्रज-धनकवडीमध्ये सर्वात कमी म्हणजे ३४ सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यापैकी २६ कार्यरत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 250 cameras installed in pune are closed zws

ताज्या बातम्या