वारकऱ्यांचा टेम्पो घाटात पडल्याने दोन महिलांसह तीन ठार; ४३ जखमी

पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पो चालकाला घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला.

पंढरपूरहून आळंदीकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या टेम्पो चालकाला घाटातील वळणाचा अंदाज न आल्याने टेम्पो दीडशे फूट दरीत कोसळला. त्यात दोन महिलांसह एकूण तीन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, ४३ जण जखमी असून त्यात ३५ महिलांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्य़ातील उरळीकांचन जवळील शिंदवणे घाटात सोमवारी सकाळी हा अपघात झाला. हे सर्व वारकरी अकोले जिल्ह्य़ातील आहेत.
रामकृष्ण सुखदेव राऊत (वय ६५, रा. तामसी, जि. अकोला), जिजाबाई ज्ञानदेव धाकुळकर (वय ६०, रा. हातगाव, जि. अकोला), द्रोपजाबाई भिकाजी म्हेत्रे (वय ५३, रा. अकोला) यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  अकोला जिल्ह्य़ातील देवडी गावातील वारकरी राज्यातील देवदर्शनासाठी शनिवारी सायंकाळी टेम्पोने निघाले होते. या टेम्पोमध्ये साधारण तीस महिला आणि पंधरा पुरुष असे चाळीस वारकरी होते. त्यांनी रविवारी पंढरपूर येथे विठ्ठलाचे दर्शन घेतले. ते पुढे आळंदीकडे निघाले होते. जेजुरी ओलांडल्यानंतर त्यांनी पुणे शहरामार्गे जाण्याऐवजी जवळचा रस्ता म्हणून शिंदवणे घाटातून जायचे ठरवले. या घाटात सकाळी अकराच्या सुमारास टेम्पो आला असता या ठिकाणी असलेल्या अवघड वळणाचा चालकाला अंदाज आला नाही. टेम्पोवरील ताबा सुटल्याने टेम्पो दीडशे फूट खोल दरीत जाऊन कोसळला. एका व्यक्तीने ही माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर व मिलिंद मेमाणे घटनास्थळी गेले. त्याच बरोबर शिंदवणे गावातील नागरिकांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन जखमींना बाहेर काढले. जखमींना नोबेल, शिवम, ससून रुग्णालयात दाखल केले आहे. त्यापैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनोज लोहिया, अपर पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी वारकऱ्यांच्या पिशव्या, जेवणासाठीचा शिधा, भांडी विखुरलेली होती. आजूबाजूच्या दगडांवर रक्त सांडलेले दिसत होते. जखमींमध्ये ३० ते ६५ वयोगटातील महिलांचा समावेश आहे. त्यांच्या हात, पाय, खांदे आणि डोक्याला जखमा झाल्या आहेत.
अपघातग्रस्त टेम्पोचे मालक रवी इंदले यांनी सांगितले की, अकोले जिल्ह्य़ातील साधारण चाळीस वारकरी देवदर्शनासाठी शनिवारी सायंकाळी निघाले होते. या दिंडीचे प्रमुख चोपडे महाराज यांनी टेम्पो मागितल्यानंतर तसाच त्यांना दिला होता. या अपघाताची माहिती मिळताच आपण पुण्याकडे निघालो आहोत.
केवळ लिंबाच्या झाडामुळे…
लिंबाचे एका झाडामुळे अपघातातील मृतांची संख्या कमी राहिल्याचे आता स्पष्ट झाले आहे. घाटात दरीच्या उतारावर हे झाड आहे. टेम्पोचालकाला घाटातील वळणाचा अंदाज आला नाही. त्यामुळे टेम्पो दरीत एकदम कोसळला, तेव्हा मध्येच असलेल्या या लिंबाच्या झाडावर टेम्पो आदळला आणि त्याचा कोसळण्याचा वेग कमी झाला. त्यानंतर तो पलटी खात दरीत खाली गेला. त्यामुळे त्याचा आघात कमी झाला. अन्यथा, मृत्यांची संख्या वाढली असती, असे अपर पोलीस अधीक्षक परदेशी यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 3 warkari died in shindwane ghat in tempo accident

ताज्या बातम्या