पुणे : पनीरच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या ॲनालॉग अथवा दुग्धेतर पनीरच्या उत्पादनासह विक्रीवर एक वर्षासाठी बंदीचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या बंदीचे दुग्ध उद्योगातून स्वागत करण्यात आले आहे. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासोबत दुग्ध उद्योगासाठी फायद्याचा हा निर्णय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. दरम्यान, बाजारात विक्री होणाऱ्या पनीरमध्ये ॲनालॉग पनीरचा वाटा सुमारे ७० टक्के असावा, असा अंदाज उद्योगातून व्यक्त करण्यात आला आहे.
सरकारने ॲनालॉग पनीरचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी बंदी घातली आहे. राज्यभरातील तपासणीत पनीरचे ३५.४ टक्के नमुने विहित मानकांशी विसंगत आढळले होते. तसेच, अनेक नमुन्यांमध्ये दुधातील स्निग्धांशाऐवजी वनस्पतीजन्य स्निग्धांशाचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे सार्वजनिक आरोग्याच्या हितातून सरकारने हा बंदीचा निर्णय घेतला आहे. ॲनालॉग पनीर हे स्वस्त असल्याने हॉटेलमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असल्यावरही बोट ठेवण्यात आले होते.
या निर्णयाचे राज्यातील दुग्ध उद्योगाने स्वागत केले आहे. ‘पनीर आणि ॲनालॉग पनीर यातील फरक सर्वसामान्य ग्राहकांना ओळखता येत नाही. एवढेच काय हॉटेलचालकांनाही यातील फरक कळत नाही. त्यामुळे पनीरच्या नावाखाली सुरू असलेल्या ॲनालॉग पनीरवर बंदी आणण्याची मागणी दुग्ध उद्योगाकडून करण्यात आली होती. त्यावर अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी हॉटेलचालकांनी मेन्यूमध्ये पनीर आणि ॲनालॉग पनीर, असा उल्लेख स्पष्टपणे करावे, असे निर्देश दिले होते. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत फारसा फरक पडला नव्हता. त्यामुळे अखेर हे बंदीचे पाऊल उचलण्यात आले,’ अशी माहिती दुग्ध उद्योगातील प्रतिनिधींनी दिली.
प्रतिकिलो सरासरी किंमत
पनीर – ३५० रुपये
ॲनालॉग पनीर – २५० रुपये
तुटवडा होणार नाही
ॲनालॉग पनीरवरील बंदीमुळे दुधापासून बनविण्यात आलेल्या पनीरला मागणी वाढणार आहे. बाजारात विक्री होत असलेल्या पनीरमध्ये ७० टक्के ॲनालॉग पनीर असते. ॲनालॉग पनीरवरील बंदीमुळे बाजारात तुटवडा निर्माण होण्याची कोणतीही शक्यता नाही. कारण राज्यातील दुग्ध उद्योगाची मागणीपेक्षा जास्त पनीर उत्पादन करण्याची क्षमता आहे. या निर्णयामुळे दुग्ध उद्योगासह दूध उत्पादक शेतकऱ्यालाही फायदा होणार आहे, असे महाराष्ट्र राज्य दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे सचिव प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.
ग्राहकांच्या हिताचा निर्णय
पनीरच्या नावाखाली ॲनालॉग पनीरची विक्री ही ग्राहकाची शुद्ध फसवणूक होती. सरकारने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे. दुग्ध उद्योगाकडून याबाबत मागणी केली जात होती. ॲनालॉग पनीर प्रमाणित नसल्याने त्यात वापरण्यात येणारी रसायने आणि इतर घटकांबाबतही साशंकता होती. या निर्णयामुळे दुग्ध उद्योगाला फायदा होणार असली तरी व्यापक जनहिताच्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्वाचा आहे, अशी प्रतिक्रिया चितळे डेअरीचे भागीदार गिरीश चितळे यांनी दिली.
हॉटेलांमध्ये जास्त वापर
पनीरमध्ये दुधातील स्निग्धांश तर ॲनालॉग पनीरमध्ये वनस्पतीजन्य स्निग्धांश वापरला जातो. ॲनालॉग पनीरच्या उत्पादनासाठी सरकारकडून अधिकृत परवाना दिला जात होता. मात्र, हा पनीरला स्वस्त पर्याय असल्याने हॉटेलचालकांकडून त्याचा जास्त वापर केला जात होता. याचबरोबर पनीरच्या नावाखाली ॲनालॉग पनीरची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात होती. त्यामुळे त्यावर बंदीचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त दि.वा.भोगावडे यांनी दिली.
