पुणे जिल्ह्यात नुकत्याच ६१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये सरपंच पदाची थेट जनतेमधून निवड झाली. मात्र, सदस्य पदाच्या ३० जागा रिक्त राहिल्या आहेत. निवडणुकीसाठी काही ठिकाणी कोणीच अर्ज भरलेले नाहीत, तर काहींचे अर्ज बाद झाले आहेत. परिणामी सदस्य पद रिक्त राहिले आहे. त्यामुळे या ठिकाणी आता पोटनिवडणूक घेण्यात येणार असून निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर होणार आहे. त्यावेळी या जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

हेही वाचा >>> पुणे : दहीहंडी उत्सवात गोळीबार ; गुंड टोळीवर मोक्का कारवाई

रिक्त राहिलेल्यांमध्ये महिला प्रवर्गातील सदस्य पदाची संख़्या जास्त आहे. तसेच जुन्नर आणि आंबेगावमधील ग्रामपंचायतींचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे सदस्य पद रिक्त असलेल्या ग्रामपंचायतींमधील ही पदे भरण्यासाठी आता काही महिने वाट पाहावी लागणार आहे. राज्य निवडणुक आयोग ज्यावेळी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करेल, त्याचवेळी या रिक्तपदांसाठी निवडणुका घेण्यात येणार आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.