जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद आणि औंध येथील जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शाळेय विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये ३१२६ विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे समोर आले आहे. त्यापैकी १६४२ मुलांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी ७३ पथके कार्यरत असून त्यामध्ये एक पुरुष वैद्यकीय अधिकारी, एक महिला वैद्यकीय अधिकारी, सहायक परिचारिका आणि औषधनिर्माण अधिकारी यांचा समावेश आहे. अंगणवाडी स्तरावरील बालकांची वर्षातून दोनदा, तर शालेय स्तरावरील मुलांची वर्षातून एकदा तपासणी करण्यात येते. या आरोग्य तपासणीत दोष असलेल्या मुलांना योग्य ते उपचार देण्यात येतात आणि त्यांचा पाठपुरावा करण्यात येतो. तपासणीत जन्मतः व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होणारे आजार, शारीरिक व मानसिक विकासात्मक विलंब या बाबींचे निदान करून मुलांना पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भित करण्यात येते.

सन २०१८ ते २०२२ पर्यंत एकूण ३८८४ मुलांच्या शस्त्रक्रिया ग्रामीण किंवा उपजिल्हा किंवा जिल्हा रुग्णालय तसेच करार केलेल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. दरम्यान, जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ५५५० शाळांमधील ११ लाख ७४ हजार २०४ मुलांची यापूर्वी असलेल्या आजारांची, वारंवार आजारी असल्याने शाळेत गैरहजर राहणारे विद्यार्थी आणि वारंवार आरोग्य विषयक तक्रार करणारे विद्यार्थी यांची खासकरून दृष्टीदोष असणाऱ्या मुलांची तपासणी करण्याचे नियोजन ऑगस्ट महिन्यात केले होते. त्यामध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या (सहा ते १८ वयोगट) ४०४७ शाळांमधील दोन लाख आठ हजार १७ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३१२६ विद्यार्थ्यांना दृष्टीदोष असल्याचे निदान झाले. त्यापैकी १६४२ मुलांना मोफत चष्मे देण्यात आले आहेत, असेही प्रसाद यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3126 children are visual impairment in the pune district pune print news zws
First published on: 28-09-2022 at 20:06 IST