माळीण दुर्घटनाग्रस्त घटनेमध्ये बेघर झालेल्या ३४ कुटुंबांना पावसाळ्यापूर्वी निवारा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात सुरू असलेल्या विकास कामांना जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी नुकतीच भेट दिली. उपविभागीय अधिकारी कल्याण पांढरे या वेळी उपस्थित होते.
माळीण दुर्घटनाग्रस्तांच्या पुनर्वसनाची जिल्हा प्रशासनातर्फे हाती घेण्यात आलेली विकास कामे समाधानकारकरीत्या सुरू असून ही कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वय ठेवण्याची गरज असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले. या दुर्घटनेमध्ये बेघर झालेल्यांपैकी ३४ कुटुंबांना पावसाळ्यापूर्वी निवारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषदेतर्फे प्लॉटचे सपाटीकरण करणे, गावाची आधार भिंत बांधणे, अंतर्गत रस्ते बांधणे, वृक्षारोपण करणे, स्मृतिवनाची उभारणी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम, भूमिगत गटार आणि मलनिस्सारण ही कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. यापैकी काही कामे पावसाळा सुरू झाल्यावर थांबविण्यात येणार असून पावसाळा संपल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात येतील, असेही राव यांनी सांगितले. सध्या प्रगतीपथावर असलेल्या कामांच्या दर्जाची तपासणी तज्ज्ञ संस्थांकडून करण्यात येत असून कामे पूर्ण झाल्यावर कामांच्या दर्जाची स्वतंत्र यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे संवर्धन करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना या वेळी दिली.
पुढील काळात स्थानिक जैवविविधतेस अनुकूल असलेल्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणावर लागवड करण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
विकास कामांच्या प्रगतीबाबत लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याच्या सूचना सौरभ राव यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिल्या. सध्या सुरू असलेल्या विकास कामांबाबत ग्रामस्थांशी संवाद साधण्यात आला असून ते समाधानी आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.