पुणे : शहर, परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या पावसामुळे ३४ झाडे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही, अशी माहिती अग्निशामक दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. शहर, परिसरात गुरुवारी रात्री साडेनऊनंतर पाऊस सुरू झाला. त्यानंतर सलग दोन तास जोरात पाऊस झाला.
मध्यरात्रीपर्यंत पाऊस सुरू होता. पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागांत ३४ ठिकाणी झाडे कोसळली. पाषाण रस्त्यावरील पंचवटी परिसरात एक मोठे झाड मोटारीवर कोसळले. जवानांनी फांद्या कापून अडकलेली माेटार बाहेर काढली. या भागातील रस्ता झाड पडल्यानंतर बंद झाला होता. जवानांनी फांद्या हटवून रस्ता वाहतुकीस खुला करून दिला.
धायरीत फर्निचर कारखान्यास आग
सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एका फर्निचर तयार करण्याच्या कारखान्यास आग लागल्याची घटना घडली. पुणे महानगरपालिका, पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए ) अग्निशामक दलातील जवानांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. या घटनेत कोणी जखमी झाले नाही. आगीत फर्निचर साहित्य, लाकूड, दुचाकी जळाली. अग्निशामक अधिकारी प्रभाकर उमराटकर, नीलेश पोकळे, भरत गोगावले, पांगारे, हर्षद कांबळे, हृषीकेश हुंबे यांनी आग आटोक्यात आणली.