पिंपरी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात ३ हजार ४९६ जणांनी सहभाग घेतला. जवळपास ४० ठिकाणी आयोजित या शिबीरात हे रक्त संकलित करण्यात आले. स्वातंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन म्हणून या शिबीराचे आयोजन करण्यात आले. स्वत: खासदार कोल्हे यांनी जुन्नरला निमगाव सावा येथे रक्तदान केले.

भोसरी (१२७२), जुन्नर (७७६), शिरूर (४७८), आंबेगाव (४७७), हडपसर (३९७), खेड (९७) असे विधानसभा मतदारसंघनिहाय रक्तदान झाले. एकूण ४० रक्तदान केंद्रापैकी सर्वाधिक ३७३ बाटल्या रक्त नेहरूनगर केंद्रात संकलित केले गेले. रक्तदान शिबारास तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. प्रत्येक रक्तदात्याला सहा लाख रुपयांचे सुरक्षा कवच (तीन लाखांचा अपघाती खर्च वैद्यकीय विमा आणि जीवीत हानी झाल्यास कुटुंबाला तीन लाख रुपये) देण्यात आले. भोसरीतील रक्तदान यशस्वी होण्यासाठी माजी आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आदींनी पुढाकार घेतला. डॉ. कोल्हे यांनी दिवसभरात अनेक रक्तदान केंद्रांना भेटी दिल्या.