वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनात जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर चार गुन्हेगार कारागृहातून संचित रजेवर बाहेर आल्यानंतर गेली दहा वर्षे झाले तरी परतलेले नसल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी चौघांवर संबंधित पोलीस ठाण्यात फरार झाल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शाम राजप्पा आणपूर, शहाजी नामदेव कुचेकर (दोघेही रा. बी.जी. शिर्के कंपनी गेट समोर, मुंढवा), सलीम कल्लम खान (रा. महंमदवाडी रस्ता, हडपसर), कदीर मोहंमद शेख (रा. डिफेन्स कॉलनी, कोंढवा रस्ता) अशी फरार झालेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. या चारही गुन्हेगारांनी वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून केला होता. या प्रकरणी प्रत्येकाला जन्मठेची शिक्षा झाली होती. आणपूर याला सप्टेंबर १९९६ मध्ये तीस दिवसांच्या संचित रजेवर सोडले होते. मात्र, तो अद्यापही परत आलेला नाही. कुचेकर याला जन्मठेपेची शिक्षा झाल्यानंतर येरवडा कारागृहातून मार्च १९९७ मध्ये संचित रजेवर सोडले होते. तेव्हापासून कुचेकर हा परत आलेलाच नाहीत. खान हा २००२ पासून फरार आहे, तर शेख हा २००५ पासून फरार आहे.
राज्याच्या कारागृहाच्या प्रमुख मीरा बोरवणकर यांनी संचित रजेवर बाहेर सोडल्यानंतर फरार झालेल्या कैद्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरात आतापर्यंत पंधरा गुन्हे दाखल झाले आहेत. येरवडा कारागृहातून संचित रजेवर सोडल्यानंतर फरार झालेल्यांची संख्या शंभरावर आहे.