पिंपरी : आठ वर्षाच्या मुलासोबत अश्लील चाळे केल्याप्रकरणी ४० वर्षीय बांधकाम मजुराला अटक करण्यात आली आहे. ही घटना चिंचवड येथील बिजलीनगरमध्ये मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी घडली. नागनाथ श्रीहरी कासले (वय ४०, रा. काळेवाडी फाटा) असे अटक करण्यात आलेल्या मजुराचे नाव आहे. याबाबत एका व्यक्तीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चिंचवड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी याबाबत माहिती दिली.

आठ वर्षाचा पिडीत मुलगा बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याच्या मित्राच्या घरी खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी कासले याने मुलाशी अश्लील चाळे केले. घरी आल्यावर मुलाने घडलेली हकीगत आईला सांगितली. आईने घडलेली हकीगत मुलाच्या वडिलांना सांगितली.

पिडित मुलासोबत असलेल्या दोन मुलांकडे चौकशी केली असता त्यांनी कासले हा जवळच्या बांधकाम प्रकल्पावर काम करीत असल्याचे सांगितले. पिडीत मुलाचे वडील व शेजारी यांनी बांधकामाच्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तो मिळून आला नाही. मात्र, बांधकाम मालकाने काही छायाचित्र दाखविले असता लहान मुलांनी कासले याला ओळखले. त्यानुसार, पोलिसात तक्रार दाखल झाल्यावर त्याला चिंचवड पोलिसांनी अटक केली.

Story img Loader