जमिनीसाठी शासनदरबारी प्रयत्न असल्याची चर्चा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आता ४११ एकर जागाही कमी पडू लागल्याने अधिक जागा मिळवण्यासाठी विद्यापीठाकडून सरकार दरबारी प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, अधिक जागा मिळण्याबाबत अद्याप कोणताही प्रस्ताव तयार करण्यात आला नसल्याचे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.
विद्यापीठातील विभाग, ग्रंथालये, वसतिगृहे, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, प्रशासकीय कार्यालये विस्तीर्ण परिसरात उभारली आहेत. उर्वरित जागा उद्याने, सामाईक रस्ता, मैदानासाठी ठेवण्यात आली आहे. यातील काही जागा वनविभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे तिचा वापर बंद आहे. तरीही ४११ पैकी सुमारे १६० एकरवर बांधकाम करण्यासाठी विद्यापीठाला परवानगी आहे; मात्र आता ही १६० एकर जागाही कमी पडू लागल्याने अधिक जमीन मिळविण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात सुरू आहे.
पुणे विद्यापीठातील मोजक्या प्रशासकीय इमारती वगळल्या, तर बहुतेक इमारती या शैक्षणिक विभाग, वसतिगृहे आणि कर्मचारी निवासाच्या आहेत. अनेक शैक्षणिक विभागांमधील विद्यार्थीसंख्या रोडावली आहे. जयकरसारखे मोठे ग्रंथालय असतानाही प्रत्येक विभागाचे स्वतंत्र छोटे ग्रंथालय आहे. तेही अनेकदा ओस पडलेले दिसते. त्या शिवाय विद्यापीठात चक्कर मारली तर अनेक ठिकाणी नवी बांधकामे सुरू असलेलीही दिसून येतात. तरीही विद्यापीठाला भविष्यात नवी संकुले उभारायची आहेत. त्यासाठी आता जमीन कुठून आणायची असा प्रश्न पडला आहे. विद्यापीठाला परवानगी असणाऱ्या चटई क्षेत्र निर्देशांकापैकी (एफएसआय) किंवा बांधकाम क्षमतेपैकी ६० टक्के क्षमता वापरात आली आहे. अजून ४० टक्के एफएसआय शिल्लक आहे. मात्र त्याचा वापर आहे त्या इमारतींवर मजले चढवण्यासाठीच करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांनी दिली. प्लिंथ एरिया म्हणजे मूळ जमीन मात्र कमी पडत असल्याची कुरकुर विद्यापीठात सुरू झाली आहे.

‘‘भविष्यात जागा अपुरी पडू शकेल. जागा मिळवण्याबाबत आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र त्याबाबत कोणताही प्रस्ताव अद्याप तयार झालेला नाही वा शासनाकडे अजून याबाबत मागणी केलेली नाही.’
– डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ