किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पुनरूज्जीवन प्रकल्पांतर्गत गेल्या तीन वर्षांपासून स्वयंसेवी संस्था , ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि किर्लोस्कर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने खाटपेवाडी येथील तलाव पुनरूज्जीवनाचा परिणाम म्हणून रामनदी उगमक्षेत्रातील पाणी क्षमतेमध्ये ४५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ड्रोनव्दारे नुकतेच या तलावाचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यातून हा निष्कर्ष समोर आला आहे.

संपूर्ण जून महिना पावसाने महाराष्ट्रात ओढ दिली. तसेच धरण क्षेत्रात पाऊस न झाल्याने पाण्याच्या नियोजनासाठी पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर सातत्य आणि चिकाटीने खाटपेवाडी तलावावर काम केल्याने या तलावाच्या पाण्याची क्षमता ४५ टक्क्यांनी वाढली असल्याचा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती  किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पुनरूज्जीवन प्रकल्पाचे समन्वयक वीरेंद्र चित्राव यांनी दिली.

चित्राव म्हणाले, १९७२ च्या भीषण दुष्काळामध्ये हा मानवनिर्मित पाझर तलाव बांधण्यात आला होता. तेव्हापासून या तलावातील गाळ काढण्यात आला नव्हता. किर्लोस्कर वसुंधरा रामनदी पुनरूज्जीवन प्रकल्पाअंतर्गत या तलावातून सुमारे तीनशे ट्रक गाळ काढण्यात आला आणि तो  तलावाच्या किनाऱ्यावर लावण्यात आलेल्या दोनशे देशी झाडांसाठी वापरण्यात आला. ही झाडे आता १५ ते २० फुटांपर्यंत वाढली आहेत.  

एच.व्ही. देसाई महाविद्यालयातील विद्यार्थांच्या मदतीने तलावावर विविध प्रयोग राबविण्यात आले. या प्रयोगांमुळे पाण्यातील प्रदूषीत तत्वे शोषून घेतली जातील, अशा वनस्पती तलावात सोडण्यात आल्या. यामुळे पाण्याची ऑक्सिजन पातळी वाढली आहे. गाळ काढल्याने तलावाची पाणी साठवणूक क्षमतेमध्ये ४५ टक्क्यांची भर पडली आहे. या पाझर तलावातील पाण्याची क्षमता वाढल्याने आजूबाजूच्या विहिरींंची पाण्याची क्षमता वाढली. पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या १२ संस्था, ३३ महाविद्यालये, रामनदी परिसरातील २५ शाळा तसेच किर्लोस्कर कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे काम उभे राहिले, असे चित्राव यांनी सांगितले.