scorecardresearch

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण निम्मे रिकामे; पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन

पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणात आजमितीला ४८.९३ टक्के इतका पाणीसाठा आहे.

48 percent water in pavana dam
पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणामध्ये यंदा मार्चअखेरपर्यंत दिलासादायक पाणीसाठा आहे.

पिंपरी: पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणा-या मावळातील पवना धरणात आजमितीला ४८.९३ टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलै अखेर पर्यंत पुरेल एवढा हा साठा असून गतवर्षीच्या आजच्या तारखेला ४९.०३ टक्के पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का कमी पाणीसाठा आहे. पाणीसाठा पुरेसा असला तरी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.

पिंपरी-चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या पवना धरणामध्ये यंदा मार्चअखेरपर्यंत दिलासादायक पाणीसाठा आहे. यावर्षी पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने तब्बल तीनवेळा धरण शंभर टक्के भरले होते. पाणलोट क्षेत्रात यंदा दोन हजार ७७७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. तर, गतवर्षी दोन हजार ७२२ मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्यावर्षीपेक्षा ५५ मिमी पावसाची अधिक नोंद झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत पवना धरण तुडुंब भरले होते.

मार्चमध्ये देखील धरणात ४८.९३ टक्के पाणीसाठा आहे. हा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा आहे. त्यामुळे शहरवासीयांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाही. धरणातील पाणीसाठा पुरेसा असला. तरी, आता उन्हाळा वाढू लागला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर वाढेल. कडक उन्हाच्या बाष्पीभवनामुळे धरणातील पाणीसाठ्यात घट होईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.  

सव्वातीन वर्षांपासून दिवसाआड पाणीपुरवठा

पवना धरणात शंभर टक्के पाणीसाठा असतानाही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होता असल्याने समन्यायी पाणीवाटपाचे कारण देत महापालिकेने २५  नोव्हेंबर २०१९ पासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला. २५ जानेवारी २०२० पर्यंत ही पाणीकपात असणार होती. पंरतु, महापालिका प्रशानाने अनिश्चित काळासाठी कपात पुढे कायम ठेवली. सव्वातीन वर्षे झाले. तरी, पिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. दररोज पाणीपुरवठा करण्याची नागरिकांची मागणी आहे. तर, दुसरीकडे एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु असल्याने नागरिकांना मुबलक पाणी मिळत आहे. पाण्याच्या तक्रारींच्या संख्येत देखील घट झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे.  

आंद्रा धरणातून पाणी कधी मिळणार?

आंद्रा व भामा आसखेड या दोन धरणातून २६७ एमएलडी पाणी शहराला मिळणार आहे. आंद्रा धरणाचे शंभर एमएलडी पाणी शहरात पहिल्या टप्प्यात येणार आहे. हे अतिरिक्त पाणी शहराला येण्याबाबत तत्कालीन सत्ताधारी भाजप, प्रशासकांनी वारंवार ‘डेडलाईन’ दिल्या. परंतु, त्याचे अद्याप पालन झाले नाही. शहरवासीयांना अद्यापही पाणी मिळाले नाही. आंद्रा धरणातील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखलीतील जलशुध्दीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले आहे. निघोजेतील अशुद्ध पाणीउपसा केंद्राचे कामही पूर्ण झाले आहे. असे असतानाही केवळ उद्घाटनाअभावी वाढीव पाण्यापासून शहरवासीयांना वंचित ठेवल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. तर, जलशुद्धीकरण केंद्राचे काम अद्याप सुरू असून चाचण्या केल्या जात असल्याचे प्रशासकांकडून सांगण्यात येते. वाढीव पाणी कधी मिळणार याकडे शहरवासीयांचे लक्ष्य लागले आहे.

पवना धरणात आजमितीला ४८.९३ टक्के इतका पाणीसाठा आहे. जुलैअखेरपर्यंत पुरेल एवढा हा पाणीसाठा आहे. पुरेसा पाणीसाठा असला तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा. जेणेकरुन पुढील काळात पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये.

समीर मोरेशाखा अभियंता पवना धरण

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 05:30 IST

संबंधित बातम्या