पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी, सातवीच्या अंतरिम (तात्पुरता) निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थी, पालक आणि शाळांना हा निकाल ऑनलाइन पाहता येणार असून, गुणपडताळणीसाठी २ ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महेश चोथे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यंदा पाचवी आणि आठवी या इयत्तांशिवाय चौथी आणि सातवी या इयत्तांसाठीही शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार राज्य परीक्षा परिषदेमार्फत २६ एप्रिल रोजी राज्यभरील परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. चौथी आणि सातवीचे मिळून ११ लाख ५५ हजार ६९५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यात चौथीच्या ६ लाख ९४ हजार ५९७ विद्यार्थ्यांपैकी ६ लाख ५७ हजार ७७, तर सातवीच्या ४ लाख ६२ हजार १३८ विद्यार्थ्यांपैकी ४ लाख ३३ हजाहर ८५७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी, पालक, शिक्षकांचे परीक्षेच्या अंतरिम निकालाकडे लक्ष लागले होते.
अंतरिम निकाल शाळांना त्यांच्या लॉगिनद्वारे, तर पालकांना परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळाद्वारे पाहता येणार आहे. निकालाबाबत विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगिनमधून २ ऑगस्टपयर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. तसेच विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव किंवा आईचे नाव यामध्ये दुरुस्ती करावयाची असल्यास त्यासाठीही २ ऑगस्टपर्यंत संबंधित शाळांच्या लॉगिनमधून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. ऑनलाइन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून आलेल्या, तसेच दिलेल्या मुदतीनंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले आहे.
शाळेची माहिती, शाळेचे क्षेत्र (शहरी अथवा ग्रामीण) किंवा अभ्यासक्रमाशी संबंधित दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी स्वाक्षरीसह सविस्तर विनंतीपत्र तयार करून ते puppsshelpdesk@gmail.com या ई-मेलवर २ ऑगस्टपर्यंत पाठवावे, असेही परिषदेने नमूद केले आहे. दिलेल्या मुदतीत, आवश्यक शुल्कासह प्राप्त झालेल्या अर्जांनुसार गुणपडताळणीचा निर्णय निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत कळवण्यात येईल. दिलेल्या मुदतीत ऑनलाइन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल, गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले.
