पुणेः पुणे विभागात ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने अन्नभेसळ करणाऱ्यांविरोधात मोठी कारवाई करून गूळ उद्योग, हॉटेल-रेस्टॉरंट आणि अन्न प्रक्रिया उद्योगांवर छापे टाकले. या कारवाईत ३३ लाख ५४ हजार २३७ रुपयांचा भेसळयुक्त व संशयित साठा जप्त करण्यात आला असून, १० हॉटेलांचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले आहेत.

‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने गेल्या काही दिवसांत व्यापक तपासणी मोहीम राबविली. दौंड तालुक्यातील विविध गुळ उद्योगांवर टाकलेल्या छाप्यांत अस्वच्छ वातावरणात रासायनिक पदार्थांचा वापर करून गूळनिर्मिती होत असल्याचे उघड झाले. या कारवाईत विविध ठिकाणांहून ३३ लाख ५४ हजार २३७ रुपयांचा गुळ, साखर, रसायने व पॅकिंग साहित्याचा साठा जप्त करण्यात आला. अनेक उद्योगांचे परवाने निलंबित करण्यात आले असून, काहींना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

याच मोहिमेदरम्यान पुणे आणि सोलापूर येथे तूप व खाऱ्या पदार्थांचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांची तपासणी करण्यात आली. पुण्यातील एका उद्योगातून लेबल नसलेले आणि भेसळीचा संशय असलेले २३० किलो तूप, तर सोलापूरमध्ये १६० किलो खारे पदार्थ जप्त करण्यात आले. दोन्ही प्रकरणांमध्ये नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

हॉटेल आणि रेस्टॉरंट तपासणी मोहिमेतही मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या. अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन, निकृष्ट साठवण व्यवस्था आणि ग्राहक सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी पुणे, सातारा आणि सांगली जिल्ह्यातील १० हॉटेल व रेस्टॉरंटचे परवाने तात्पुरते निलंबित करण्यात आले. अन्न सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. प्रशासनाने नागरिकांनाही भेसळयुक्त अन्न किंवा अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.