पुणे : लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त पुणे आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पुणे यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून (डीपीडीसी) औषधे आणि लस खरेदीसाठी प्रत्येकी २५ लाख याप्रमाणे ५० लाखाच्या खर्चाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी मान्यता दिली.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर

हेही वाचा : इंजिनियर्स डेच्या दिवशीच अंबरनाथमध्ये सरकारी अभियंत्यांची शिंदे गटाच्या आमदाराकडून खरडपट्टी

लम्पी रोगावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासम्कडून युद्धपातळीवर उपाययोजना करण्यात येत आहेत. विशेषत: लसीकरणावर भर देण्यात आला आहे. लम्पी रोगाचा संसर्ग झालेल्या पशुधनाला इतर जनावरांपासून वेगळे ठेवून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. या उपचारासाठी पुरेशी औषधे आणि लसमात्रादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यादृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून या खर्चास तातडीने मान्यता देण्यात आली आहे. लम्पी नियंत्रणासाठी आवश्यकता असल्यास अधिकचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. केंद्र किंवा राज्य शासनाकडून लम्पी आजारावरील लशीसाठी निधी उपलब्ध झाल्यास हा निधी प्राधान्याने औषधांसाठी वापरण्यात यावा, असेही मंजूरी आदेशात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : ‘११ हफ्ते ग्राहकांचे १२ वा आमचा’ योजनेच्या नावाखाली ठाण्यातील ज्वेलर्सने घातला ५७ कोटींचा गंडा

दरम्यान, बाधित जनावरे आढळलेल्या गोठ्यापासून पाच किलोमीटर परिसरातील सर्व पशुधनाचे तातडीने लसीकरण करण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून त्यानुसार मोहीम स्तरावर हे काम करण्यात येत आहे. निगराणी क्षेत्रातील चार लाख ४० जनावरांचे लसीकरण करावयाचे असून त्यापैकी एक लाख ५५ हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. बाधित जनावरे आढळलेल्या भागापासून पाच किलोमीटरच्या क्षेत्रातील सर्व पशुधनावर मोफत औषधोपचार केले जाणार आहेत. लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाची एकूण २९० पथके नेमण्यात आले असून त्यासाठी ७३० अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : ठाणे शहरात ज्येष्ठांसह महिलांना स्वाइनची लागण होण्याचे प्रमाण सर्वाधिक ; घोडबंदर परिसर रुग्ण संख्येत आघाडीवर

दोन लाख ८५ हजार ७०० लसमात्रा उपलब्ध

जिल्ह्यात १२ तालुक्यातील ७६ ठिकाणी पशुधनाला लम्पीचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. ३०६ जनावरांना लम्पी संसर्ग झाला असून त्यापैकी आठ जनावरांचा मृत्यू झाला आहे आणि १७७ सक्रीय असून १२१ बरे झाले आहेत. हा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी आणि बाधित जनावरांवर औषधोपचार करण्याबाबत जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. त्यासाठी दोन लाख ८५ हजार ७०० लसमात्रा उपलब्ध झाल्या आहेत. जिल्हा संनियंत्रण समितीच्या बैठकीतही याबाबत आढावा घेण्यात आला आहे.

रिंग व्हॅक्सीनेशन पद्धती

लम्पी संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लसीकरण पद्धतीला ‘रिंग व्हॅक्सिनेशन’ असे म्हणतात. यात बाधित जनावराचे ठिकाण किंवा गोठा केंद्र मानून पाच किलोमीटरच्या परिघाच्या भागातील लसीकरण आधी करण्यात येते आणि तेथून सुरूवात करीत बाधित भागाकडे जात जनावरांचे लसीकरण करण्यात येते. त्यामुळे संसर्गाची तीव्रता कमी करण्यास मदत होते असे पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शितलकुमार मुकणे यांनी सांगितले.