पुणे जिल्ह्यातील विसर्गावरच उजनीत ५० टीएमसी पाणी ; सोलापूरची तहान भागविण्यात पुणे जिल्ह्याचा वाटा

जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी हे महत्त्वाचे आणि राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे.

पुणे जिल्ह्यातील विसर्गावरच उजनीत ५० टीएमसी पाणी ; सोलापूरची तहान भागविण्यात पुणे जिल्ह्याचा वाटा
संग्रहित छायाचित्र

पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील उजनी हे महत्त्वाचे आणि राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १ जूनपासून अवघ्या ४१३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हे धरण सध्या भरण्याच्या मार्गावर असून येत्या दोन-तीन दिवसांत या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाणार आहे. उजनीत सध्या सुमारे ५० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी असून, पुणे जिल्ह्यातून होणाऱ्या विसर्गावरच त्यातील बहुतांश पाणीसाठा जमा झाला आहे.

या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस न पडताही केवळ पुणे जिल्ह्यातील धरणांच्या परिसरात पडणाऱ्या पावसामुळे आणि या धरणांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे दरवर्षी उजनी धरण १०० टक्के भरते. त्यामुळे पुण्यातील धरणे सोलापूरकरांची तहान दरवर्षी भागवतात, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जिल्ह्याच्या सीमेवरील माढा तालुक्यातील उजनी हे धरण पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाचे आहे. सध्या उजनी जलाशयात १३ हजार २३३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग दौंड येथून, तर बंडगार्डन येथून ११ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी उजनीच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. सध्या हे धरण ९१.५० टक्क्यांपेक्षा जास्त भरले आहे. उजनी धरण भरण्यास केवळ पाच टीएमसी पाण्याची गरज आहे. त्यामुळे उजनीद्वारे सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा मुख्य सांडवा उघडण्यात आला आहे. या सांडव्यातून ५०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

दरम्यान, धरणात ५४ अब्ज घनफूट (टीएमसी) उपयुक्त पाणीसाठा, तर तब्बल ६३ टीएमसी तेवढाच मृत अशी एकूण धरणातील पाणी साठविण्याची क्षमता तब्बल ११७ टीएमसी एवढी आहे. पुण्यातील खडकवासला धरणसाखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांसह कासारसाई, मुळशी, पवना, चासकमान अशा विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग उजनी धरणात केला जातो, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

…म्हणून उजनी दरवर्षी १०० टक्के भरते

टेमघर, मुळशी आणि पवना धरणांत वर्षभरात प्रत्येकी तीन हजार मिलिमीटर, वरसगाव आणि पानशेत धरणक्षेत्रांत २१०० मि.मी., खडकवासला धरणात ८०० मि.मी., कासारसाई धरणात एक हजार मि.मीपेक्षा जास्त, चासकमान धरणात ७०० मि.मीपेक्षा जास्त पाऊस होतो. त्यामुळे ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर या धरणांमधून उजनी धरणात पाण्याचा विसर्ग केला जातो. परिणामी उजनी हे धरण १०० टक्के भरून या धरणातून पुढे पाण्याचा विसर्ग केला जातो, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
पुणे : जलशुद्धीकरण केंद्रांत दैनंदिन २१ टन गाळ ; धरणातील गाळ प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी