पाच हजार ढोल-ताशांचे एकत्रित तालबद्ध वादन, प्रसिद्ध तालवादक शिवमणी यांच्या आणि ढोल-ताशा वादकांच्या वादनाची जुगलबंदी आणि शिवमणी यांच्या एकल वादनाचा अभूतपूर्व अनुभव घेण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
ढोल-ताशा महासंघातर्फे स्वामी विवेकानंद यांच्या १५० व्या जयंती वर्षांनिमित्त त्यांना ढोल-ताशांच्या माध्यमातून अभिवादन केले जाणार आहे. या वेळी पाच हजार वादक ढोल-ताशांचे एकत्रित वादन करणार असून या उपक्रमाची नोंद गिनिज बुक आणि लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये करण्याचा प्रयत्न होणार आहे. यापूर्वी जागतिक स्तरावर १३५० ढोल-ताशे एकाच वेळी वाजवण्याचे रेकॉर्ड प्रस्थपित झाले आहे.
महासंघाचे सरचिटणीस पराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत याविषयी माहिती दिली. सहायक पोलिस आयुक्त दीपक हुंबरे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भानुप्रताप बर्गे, संयोजन समितीचे सदस्य प्रसिद्ध अभिनेते राहुल सोलापूरकर, विनीत कुबेर, सूर्यकांत पाठक, अशोक गोडसे या वेळी उपस्थित होते.  
३१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजता स.प. महाविद्यालयाच्या मैदानात हा कार्यक्रम होणार असून तो सर्वासाठी विनामूल्य खुला आहे. पाच हजार ढोल-ताशे पंधरा मिनिटांसाठी एकत्रितपणे वाजवण्यात येणार असून टोल वाजवण्यामुळे होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी टोल वाजवले जाणार नसल्याचे सोलापूरकर यांनी सांगितले. या वादनानंतर शिवमणी यांचे वादन होणार आहे.      
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील १२१ हून अधिक ढोल- ताशा पथके यात सहभागी होणार आहेत. शनिवारी दुपारी एक वाजता सर्व वादक मैदानावर सरावासाठी एकत्र जमणार आहेत. संध्याकाळी पाच वाजल्यापासून प्रेक्षकांना मैदानात प्रवेश मिळेल. वादक आणि निमंत्रितांना मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाईल. तर प्रेक्षकांना शिक्षण प्रसारक मंडळी इमारतीच्या बाजूला तसेच लोकमान्यनगरच्या बाजूला असणाऱ्या प्रवेशद्वारांमधून प्रवेश दिला जाणार आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव नागरिकांनी कार्यक्रमाला येताना शक्यतो वाहने आणू नयेत तसेच कमीत-कमी सामान आणावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने बर्गे यांनी केले. तर कार्यक्रमासाठी नोंदणी न केलेल्या ढोल-ताशा पथकांनी अनूप साठे यांच्याशी ९६६५०११४४८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे महासंघातर्फे कळवण्यात आले आहे.