पुणे : लोहमार्गालगतच्या निसर्ग सौंदर्याची अनुभूती घेण्यासाठी रेल्वेच्या पारदर्शी डब्यांतून (विस्टा डोम) प्रवासास पसंती मिळत आहे. मध्य रेल्वेकडून मुंबई-गोवा आणि पुणे-मुंबई मार्गावरील तीन गाड्यांमध्ये हे डबे प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गेल्या सात महिन्यांमध्ये सुमारे पन्नास हजार प्रवाशांनी या डब्यांतून प्रवास केला असून, त्यातून रेल्वेची ६.४४ कोटी रुपयांची कमाई झाली आहे.

काचेच्या रुंद खिडक्या, काचेचे छत, आरामदायी आणि आवश्यकतेनुसार फिरू शकणारी आसने, गॅलरी आदी वैशिष्ट्य असणारे विस्टा डोम डबे अल्पावधीतच प्रवाशांच्या पसंतीस उतरले आहेत. मुंबई-मडगाव या मार्गावरील दऱ्या, धबधबे, डोंगर त्याचप्रमाणे पुणे-मुंबई प्रवासादरम्यान लोणावळा-खंडाळा विभागातील विलोभनीय निसर्ग या डब्यांच्या माध्यमातून ठळकपणे अनुभवता येतो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव या जनशताब्दी एक्स्प्रेसच्या विस्टा डोम डब्यातून ऑक्टोबर २०२१ ते मे २०२२ या सात महिन्यांच्या कालावधीत १८,६९३ प्रवाशांनी प्रवास केला. त्यातून मध्य रेल्वेला ३.७० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले. मुंबई-मडगाव या गाडीला मध्य रेल्वेत सर्वात प्रथम विस्टा डोम डबा जोडण्यात आला होता. त्याचा प्रतिसाद लक्षात घेता  पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन आणि डेक्कन एक्स्प्रेस या गाड्यांनाही अनुक्रमे १५ ऑगस्ट २०२१ आणि २६ जून २०२१ पासून प्रत्येकी एक विस्टा डोम डबा जोडण्यात आला. या दोन्ही गाड्यांच्या डब्यांनाही चांगला प्रतिसाद असून, डेक्कन क्वीनच्या माध्यमातून १.६३ कोटी, तर डेक्कन एक्स्प्रेसच्या माध्यमातून १.११ कोटींचा महसूल मध्य रेल्वेला मिळाला आहे.