52 complaints of violation of code of conduct in Kasba and Chinchwad before candidates Pune print news psg 17 ysh 95 | Loksatta

कसबा आणि चिंचवडमध्ये उमेदवार निश्चित होण्यापूर्वीच आचारसंहिता भंगाच्या ५२ तक्रारी

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित  झाले नसतानाच आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ५२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

pune kasba election
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

पुणे : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्चित  झाले नसतानाच आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ५२ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘सी-व्हिजिल’ उपयोजनवर या तक्रारी आल्या असून, या तक्रारींचे निरसन करण्यात आल्याचा दावा प्रशानाकडून शनिवारी करण्यात आला.

कसबा आणि चिंचवड मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नागरिकांना नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. निवडणुकीदरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन, अवैध जाहिरात फलक, मतदारांना पैसे वाटप, मद्य वाटप, भेट वस्तू किंवा आमिष दाखवणे, कोणत्याही प्रकारचे शस्त्र दाखवून धमकावणे आदी प्रकारच्या तक्रारी ऑनलाइन पद्धतीने करता येतील. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन ‘सी-व्हिजिल’ (C-VIGIL) उपयोजना मोफत डाऊनलोड करता येते.

हेही वाचा >>> Kasba and Chinchwad Election : प्रार्थनास्थळांचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

हे उपयोजन सुरु करुन त्यामध्ये छायाचित्र, चित्रफित किंवा दृकश्राव्य (ऑडिओ) तयार करुन पोस्ट केल्यांनतर तक्रारीची नोंद होते. तक्रार नोंदवल्यानंतर पाच मिनिटांत ही माहिती भरारी पथकाला पाठवली जाते. भरारी पथकाकडून तातडीने याबाबत चौकशी करून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो आणि संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तातडीने त्याच्यावर कारवाई करतात. तक्रारीचे स्वरुप व संख्येनुसार हा वेळ कमी-अधिक होतो. तक्रारीचे निरसन झाल्यानंतर तक्रारदारास उपयोजनद्वारे  संदेश जातो. याशिवाय आचारसंहिता कक्षाकडे देखील आचारसंहिता भंगाबाबत तक्रारी दाखल केल्या जाऊ शकतात, अशी माहिती उप जिल्हाधिकारी तथा समन्वय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 18:15 IST
Next Story
“चिंचवड हा भाजपाचा बालेकिल्ला, अश्विनी जगताप यांचा विजय नक्की”, गिरीश महाजनांनी व्यक्त केला विश्वास