पुणे जिल्ह्यातील आंदर मावळमध्ये ५५ वर्षीय आदिवासी महिलेला उपचारासाठी चक्क झोळीतून प्रवास करावा लागला आहे. आज ही मावळ परिसरात आदिवासी बांधव डोंगराच्या पाड्या, वस्त्यांवर वास्तव्यास आहेत. परंतु, मूलभूत सुविधांसह आरोग्य विषयक सुविधांपासून आदिवासी बांधव वंचित असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. ५५ वर्षीय आजारी महिलेला डोंगरावरील सटवाईवाडी येथून पाच ते सहा किलोमीटर पायपीट करत मुख्य रस्त्यावर आणलं मग तिथून रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. 

हेही वाचा- ‘मागणी करूनही गृहमंत्रीपद मिळाले नाही’; राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीत अजित पवारांची खंत

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने अवघ्या देशभरात अमृतमहोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. पण, खऱ्या अर्थाने भारतातील कानाकोपऱ्यात आरोग्य सुविधा, रस्ते पोहचले आहेत का? असा प्रश्न पडतो. कारण, शिक्षणाच माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील आंदर मावळ येथे एका ५५ वर्षीय आजारी आदिवासी महिलेला झोळीतून प्रवास करावा लागला आहे. आंदर मावळातील सटवाईवाडी ही वस्ती डोंगर माथ्यावर आहे. तिथं आरोग्य सुविधा आणि रस्त्यांच्या अभाव असल्याने आज ही आदिवासी बांधवांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी पाच ते सहा किलोमीटर ची पायपीट करावी लागते आहे.

हेही वाचा- ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा; राज्यातील सर्व मोठी धरणे भरली, पाऊस अंतिम टप्प्यात

आजारी, वृद्ध व्यक्तींना झोळीतून प्रवास करावा लागतो आहे. नागमोडी वळण घेऊन ऊन, पावसाची तमा न बाळगता आदिवासी बांधवांना धावपळ करावी लागते आहे. अशीच अवस्था अनेक पाड्यावरील आणि वस्त्यावरील आहे. लोणावळा, मावळ, आंदर मावळ या ठिकाणी अनेक ठिकाणी रस्ते नसल्याने आदिवासी बांधवांना मूलभूत सुविधांसाठी झगडावं लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची नितांत गरजेचं आहे.